मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ रननी पराभव केला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. न्यूझीलंडविरुद्धच्या या मॅचमध्ये टीम इंडियाची बॅटिंग गडगडली. टीम इंडियाच्या या कामगिरीवर युवराज सिंगने प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाने चौथ्या क्रमांकासारख्या महत्त्वाच्या बॅटिंगच्या स्थानाला योग्य पद्धतीने हाताळलं नसल्याचं युवराज म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टीम प्रशासानाने चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला तयार केलं पाहिजे होतं. चौथ्या क्रमांकावरचा खेळाडू अपयशी ठरत असेल, तरी त्याला तू वर्ल्ड कप खेळणार आहेस, अशी ग्वाही द्यायला पाहिजे होती. २००३ वर्ल्ड कपआधी न्यूझीलंडमध्ये आमची कामगिरी निराशाजनक झाली. प्रत्येक खेळाडू अपयशी ठरत होता. पण तरी तेच खेळाडू वर्ल्ड कपमध्ये खेळले,' असं युवराजने सांगितलं.


अंबाती रायुडूला मिळालेल्या वागणुकीमुळे मी निराश झालो. रायुडूला जे मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं नाही, असं युवराज म्हणाला.


'रायुडूसोबत त्यांनी जे केलं ते निराशाजनक होतं. वर्ल्ड कप टीमसाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये रायुडू होता. न्यूझीलंडमधल्या सीरिजमध्ये रायुडूने रन केले होते. पण यानंतर तीन-चार खराब खेळींमुळे रायुडूला संधी देण्यात आली नाही.'


'यानंतर ऋषभ पंत टीममध्ये आला आणि त्यालाही डच्चू देण्यात आला. जर चौथा क्रमांक हे महत्त्वाचं स्थान असेल, आणि या स्थानावर खेळाडूने चांगली कामगिरी करणं अपेक्षित असेल, तर तुम्ही खेळाडूला पाठिंबा देणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या खेळाडूला अशा पद्धतीने डावलू शकत नाही.'


'टीम प्रशासानाने मध्येच दिनेश कार्तिकला संधी दिली. चौथ्या क्रमांकासाठी त्यांची रणनिती नेमकी काय होती, हेच लक्षात आलं नाही. यानंतर त्यांनी पुन्हा ऋषभ पंतला संधी दिली. यावेळी ऋषभ पंतने चांगली कामगिरी केली. रोहित आणि विराट लवकर आऊट झाले, तर टीम अडचणीत येईल, हे सगळ्यांना माहिती होतं. टीमला चौथ्या क्रमांकासाठी मजबूत खेळाडू पाहिजे होता. टीमची रणनितीच मला समजली नाही,' असं वक्तव्य युवराजने केलं.


'रायुडूने घेतलेल्या निवृत्तीमुळेही मला दु:ख झालं. ही परिस्थिती टीम प्रशासनानं जशी हाताळली , ते पाहणं दुर्दैवी होतं. वर्ल्ड कप खेळण्यासाठी तुम्ही तयारी करता आणि अचानक तुम्हाला टीममध्ये स्थान नसल्याचं कळतं,' अशी प्रतिक्रिया युवराजने दिली.