INDvsSA : केपटाऊन दुष्काळाने हैराण, टीम इंडियाला आंघोळीसाठी दोन मिनिटेच पाणी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी उन्हाच्या काहिलीने सारेच हैराण झालेत.
केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी उन्हाच्या काहिलीने सारेच हैराण झालेत.
मैदानाच्या स्टाफला उन्हामुळे वेगवान पिच तयार करण्यासाठी समस्या येत होती. शहरातही वाढत्या तापमानामुळे पाण्याची कमतरता भासतेय. यातच टीम इंडियालाही पाणी वाचवण्याचे आदेश देण्यात आलेत. हे आदेश केवळ टीम इंडियालाच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या टीमसह संपूर्ण केपटाऊन शहराला देण्यात आलेत.
या आदेशाचे पालन करणे तितकेसे शक्य नाही. खासकरुन खेळाडूंना. आंघोळीसाठी वापरला जाणारा शॉवर दोन मिनिटांहून अधिक वापरु नये असे आदेश खेळाडूंना देण्यात आलेत.
केपटाऊनमध्ये दुष्काळ पडलाय. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई भासतेय. शहरातील एका व्यक्तीला केवळ ८७ लीटर पाणी प्रतिदिन अथवा महिन्याला १० हजार लीटर पाणी वापरण्याची सुविधा देण्यात आलीये.
खेळाडूंसाठी समस्या मात्र भारतासाठी चांगली बातमी
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या केपटाऊनमध्ये सामन्याचे आयोजन करताना द. आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांना समस्या येत असली तरी त्याचा फायदा भारताला होणार आहे. पाण्याची कमतरता असल्याने वेगवान खेळपट्टी बनवण्यात अडथळे येतायत. त्यामुळे वेगवान खेळपट्टी असण्याची शक्यता कमी आहे.
केपटाऊनमध्ये दुष्काळ स्तर ६ प्रतिबंध लागू करण्यात आलाय. दुष्काळ स्तर ६ याचा अर्थ पिण्याचे पाणी झाडांना देता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून प्रति लीटर ५१ हजार रुपयांचा दंड आहे.