आयपीएलमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात येणार डीआरएस
यंदाच्या आयपीएलमध्ये डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम वापरण्यात येणार आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम वापरण्यात येणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तान सुपरलीग(पीएसएल)नंतर आयपीएलही जगातली दुसरी टी-20 लीग असेल ज्यामध्ये डीआरएसचा वापर होणार आहे.
सुरुवातीला बीसीसीआयनं डीआरएसला विरोध केला होता. २०१६ साली इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं पहिल्यांदा डीआरएसचा वापर केला. याआधी भारत फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच डीआरएस वापरत होता. मागच्या दीड वर्षापासून भारत आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये डीआरएसचा वापर करत आहे.
७ एप्रिलपासून आयपीएलच्या अकराव्या सिझनला सुरुवात होणार आहे. या सीझनचा पहिला समाना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच रंगणार आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या टीमचं आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा फास्ट बॉलर जयदेव उनाडकट सगळ्यात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं उनाडकटला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतलं. तर इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सगळ्यात महागडा खेळाडू ठरलाय. स्टोक्सलाही राजस्थान रॉयल्सनं १२.५ कोटी रुपये देऊन विकत घेतलंय.