ED Arrested Cricketer 200 Crore Scam: उत्तर प्रदेशमधील शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधिक करणारा दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम नागला अटक करण्यात आली आहे. विक्रमला सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच 'ईडी'ने अटक केली आहे. यानंतर विक्रमला केंद्रीय तपास यंत्रणेच्या म्हणजेच सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. विक्रमला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून आता ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.


या प्रकरणामधील चौथी अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्यांग क्रिकेटपटू अशलेल्या विक्रमने शिष्यवृत्ती घोटाळ्यामध्ये हाइजिया एज्युकेशन ग्रुपच्या मदतीने दिव्यांग खेळाडूंच्या नावाने बँक खाती सुरु केली. या बँक खात्यांमध्ये शिष्यवृत्ती म्हणून जमा करण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. विक्रम हा हाइजिया ग्रुपसाठी एखाद्या एजंटप्रमाणे काम करायचा. त्याने दिव्यांगाचे प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्र या घोटाळ्याअंतर्गत बँक खाती सुरु करण्यासाठी हाइजिया ग्रुपला दिले होते. मागील अनेक महिन्यांपासून ईडी या घोटाळ्यासंदर्भात उत्तर प्रदेशमधील लखनऊसहीत 20 जिल्ह्यांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये छापेमारी करत आहे. या छापेमारीमध्ये 200 कोटींहून अधिक रक्कमेला शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये हाइजिया समुहाचे संचालक इजहार हुसैन जाफरी, फनी जाफरी, अली अब्बास जाफरी आणि कर्मचारी रवि प्रकाशला अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात आता विक्रम नागच्या रुपाने चौथ्या आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे.


कसा केला हा घोटाळा?


तपासामध्ये असं लक्षात आलं की आरोपींनी शिक्षणसंस्था अस्तित्वात असल्याचा बनाव केला. त्यांनी केवळ कागदपत्रांच्या माध्यमातून ही संस्था खरोखर अस्तित्वात असल्याचा बनाव करुन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांच्या नावाने देण्यात आलेले शिष्यवृत्तीचे पैसे हडपले. 12 वर्षांपासून 48 वर्षांपर्यंतच्या अपात्र व्यक्तींना विद्यार्थी असल्याचं दाखवून हा घोटाळा करण्यात आला. आरोपींनी 500 विद्यार्थ्यांना मिळालेली शिष्यवृत्तीची रक्कम लाटल्याचं सांगितलं जात आहे. या शिष्यवृत्तीचे पैसे मिळवण्यासाठी आरोपींनी बँक अधिकाऱ्यांबरोबरही साटेलोटे करुन घोटाळा केला. सध्या या प्रकरणाचा तपास लखनऊ पोलीस आणि एसआयटी करत आहे.



कोच म्हणूनही केलंय काम


दिव्यांग क्रिकेटपटू असलेल्या विक्रमने नागने उत्तर प्रदेश दिव्यांग क्रिकेट टीमचं कर्णधारपद भूषवलं आहे. महिला दिव्यांग क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपदही विक्रमने भूषवलं आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस विक्रमच्या मागावर होते. आता त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने नेमके किती जणांचे कागदपत्रं संस्थेला पुरवले आणि त्याबदल्यात किती पैसे घेतले हे स्पष्ट होईळ अशी पोलिसांना अपेक्षा आहे.