मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर आता बीसीसीआयने टीम इंडियाला पहिला धक्का दिला आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपद आणि सपोर्ट स्टाफसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संपणार आहे. तर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण, बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ हे पुन्हा एकदा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करु शकतात. टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि ट्रेनर शंकर बासू यांनी आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कराराचं नुतनीकरण करु नये असं, या दोघांनी बीसीसीआयला वर्ल्ड कप सुरु असतानाच सांगितलं होतं.


प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार ४५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातला वाद समोर आला. यानंतर कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली.


टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय खेळाडूही अर्ज करणार आहेत. रवी शास्त्री यांनाच प्रशिक्षक ठेवायचं का नव्या चेहऱ्याची नियुक्ती करायची? याचा निर्णय बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समिती घेणार आहे. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा समावेश आहे. 


बॅटिंग प्रशिक्षक, बॉलिंग प्रशिक्षक, फिल्डिंग प्रशिक्षक, फिजिओथेरपीस्ट, स्ट्रेन्थ ऍण्ड कन्डिशनिंग प्रशिक्षक, प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.