India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादच्या मैदानावर खेळल्या गेलल्या सामन्यात टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव झाला आहे. टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांची गरज होती. मात्र, टीम इंडियाच्या फलंदाजांनी हत्यार टाकलं अन् इंग्लंडने मालिकेतील पहिला विजय नोंदवला आहे. ऑली पोपच्या (Ollie Pope) 196 धावांच्या धुंवाधार खेळीमुळे इंग्लंडला मोठी आघाडी मिळवता आली होती. त्यामुळे आता पाहुण्या संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. डेब्यू सामन्यात टॉम हार्टले (Tom Hartley) याने 7 विकेट्स घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडने दुसऱ्या डावात 102 ओव्हरमध्ये 420 धावा केल्या अन् संघ ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 190 धावांची आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 231 धावा करायच्या. टीम इंडियाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने पराभव निश्चित दिसत होता. अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.


प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या बेझबॉलची हवा काढली. बेन स्टोक्सने 70 धावांची खेळी केली पण इंग्लंडला अडीचशेचा टप्पा देखील गाठता आला नाही. इंग्लंडचा संघ 246 धावांवर गारद झाला. टीम इंडियाकडून जडेजा आश्विन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या तर बुमराह आणि अक्षर पटेलला 2-2 विकेट्स मिळाल्या. 


भारताच्या डावाला सुरूवात झाली तेव्हा स्पिनर्सला अधिक मदत मिळू लागली होती. मात्र, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी बेझबॉल टेक्निक आमलात आणली अन् दमदार सुरूवात करून दिली. यशस्वी जयस्वालने 80 धावांची खेळी केली तर केएल राहुल याने 86 धावा केल्या. तर अखेरीस रविंद्र जडेजाने दांडपट्टा चालवला. त्याने 87 धावा कुटल्या. अक्षरने 44 धावांची खेळी केली अन् टीम इंडियाला चारशे पार पोहोचवलं होतं. टीम इंडियाने पहिल्या डावात 436 धावा उभारल्या अन् 190 धावांची आघाडी घेतली.


इंग्लंडचा लवकर गाशा गुंडाळणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळे सुरूवातीपासून रोहितने फिरकीचा मारा केला. मात्र, एकाबाजून फलंदाजी ढेपाळत असताना इंग्लंडच्या ओली पोपने फिरकीपटूंना चांगलाच चोप दिला. त्याने 196 धावांची धमाकेदार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला सामना तग धरता आला. तळातल्या फलंदाजांनी छोटछोट्या इनिंग खेळल्या अन् इंग्लंडला 420 धावांवर पोहोचवलं. टीम इंडियाकडून दुसऱ्या फेरीत बुमराहने 4 विकेट्स काढल्या तर आश्विनला 3 गडी बाद करता आले. जडेजाने दोन तर अक्षरने 1 विकेट घेतली होती.


दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 1-0 ने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात रोहित सेना कशी कामगिरी करेल, यावर सर्वांचं लक्ष लागलंय. आगामी सामना 2 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणममध्ये खेळवला जाईल.


टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.