मुंबई : आयपीएल सुरु होऊन महिना झाला. या स्पर्धेत दिवसेंदिवस रंगत वाढत चाललीये. प्रत्येक सामना आता महत्त्वाचा ठरु लागलाय. सर्वच संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत. यादरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने चार खेळाडूंना माघारी बोलावल्याचे समजतेय. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार इंग्लिश क्रिकेट बोर्डाने आपले ४ क्रिकेटर ख्रिस वोक्स, मार्क वूड, मोईन अली आणि बेन स्टोक्स यांना माघारी बोलावलेय. या खेळाडूंना १७ मेपर्यंत इंग्लंडला परतायचे आहे. खरंतर या खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी तयारी कऱण्यासाठी माघारी बोलावण्यात आलेय. इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध २४ मेला पहिली कसोटी खेळणार आहे. हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. दोन्ही देशांदरम्यान दोन कसोटी सामने होणार आहे.


या कारणास्तव बोलावले माघारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या या चार खेळाडूंना माघारी बोलावण्यात आल्याने आयपीएलमधील संघाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ज्यांना माघारी बोलावण्यात आलेय त्यापैकी ख्रिस वोक्स आणि मोईन अली आयपीएलमध्ये बंगळूरुकडून खेळतात. तर मार्क वूड चेन्नईकडून खेळतो आणि बेन स्टोक्स राजस्थानचा महत्त्वाचा क्रिकेर आहे. दरम्यान, बेन स्टोक्सची बॅट अद्याप या सीझनमध्ये तळपलेली नाहीये. मात्र त्याचे संघात असणे राजस्थानसाठी महत्त्वाचे आहे. राजस्थानचा संघ प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आटापिटा करतो त्यातच स्टोक्स बाहेर पडला तर राजस्थानसाठी हा मोठा झटका असेल.


इंग्लंडचे आणखी काही क्रिकेटर आयपीएलमध्ये खेळतायत. मात्र ज्या ४ क्रिकेटर्सना माघारी बोलावण्यात आलेय ते इंग्लंडच्या कसोटी संघातील सदस्य आहेत. ख्रिस वोक्स आणि मोईन अली जाण्याने बंगळूरुला तितकासा फरक पडणार नाही. कारण वोक्स सुरुवातीच्या सामन्यानंतर संघाबाहेरच आहे. मार्क वूडही चेन्नईचा नियमित सदस्य नाही.