तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, मॅचवर भारताची पकड आणखी मजबूत
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा तिसरा दिवस भारताचा होता.
नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा तिसरा दिवस भारताचा होता. विराट कोहलीच्या शतकामुळे या टेस्ट मॅचवर भारतानं आपली पकड आणखी मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं २३-० एवढा स्कोअर केला होता. इंग्लंडला अजूनही विजयासाठी ४९८ रनची गरज आहे. दिवसाअखेरीस किटन जेनिंग्स १३ रनवर नाबाद आणि एलिस्टर कूक ९ रनवर नाबाद खेळत आहे. आता भारतानं ठेवलेलं हे डोंगराएवढं आव्हान पार करण्यासाठी इंग्लंडला चमत्कारच करावा लागेल.
त्याआधी भारतानं ३५२-७ वर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५२१ रनचं आव्हान मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक पूर्ण केलं. टेस्ट क्रिकेटमधलं कोहलीचं हे २३वं शतक होतं. विराट कोहली १९७ बॉलमध्ये १०३ रन करून आऊट झाला. विराटच्या या खेळीमध्ये १० फोरचा समावेश होता. भारताच्या बॉलिंगच्या वेळी इंग्लंडच्या ५ विकेट घेणाऱ्या हार्दिक पांड्यानं बॅटिंग करताना ५२ बॉलमध्ये नाबाद ५२ रन केले. तर चेतेश्वर पुजारा ७२ रन करून आऊट झाला.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं १२४-२ अशी केली होती. यानंतर कोहली आणि पुजारानं भारतीय इनिंगला आकार दिला आणि भारताला भक्कम स्थितीमध्ये पोहोचवलं. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला १६१ रनवर ऑल आऊट केल्यामुळे भारताला आधीच १६८ रनची आघाडी मिळालेली होती.
५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं पहिल्या दोन्ही मॅच गमावल्या आहेत. त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी ही मॅच जिंकणं विराटच्या टीमला आवश्यक आहे.