मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह हा भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. बुमराहनं या मॅचमध्ये ८६ रन देऊन ९ विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये बुमराहनं ३३ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. ही त्याची टेस्ट क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पहिल्याच वर्षातल्या टेस्ट क्रिकेटमध्ये बुमराहनं परदेशात ३ वेळा ५ विकेट घेतल्या आहेत. बुमराहनं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात ही कामगिरी केली. यानंतर विराटनं बुमराहचं तोंड भरून कौतुक केलं आहे.


या विजयाचं सगळं श्रेय हे फास्ट बॉलरना मुख्य म्हणजे जसप्रीत बुमराहला जातं. त्याची विचार करण्याची पद्धत जगातल्या इतर बॉलरपेक्षा वेगळी आहे. मागच्या १२ महिन्यांमध्ये त्यानं दाखवलेली प्रगल्भता त्याच्या यशाचं गमक असल्याचं विराट म्हणाला.


जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगसमोर जगातल्या सगळ्या बॅट्समननी घाबरून राहायला हवं. पर्थसारख्या खेळपट्टीवर मीदेखील बुमराहविरुद्ध खेळायला घाबरलो, असतो अशी कबुली विराटनं दिली. पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टची खेळपट्टी विचित्र होती. या खेळपट्टीवर काही बॉल उसळी घेत होते, तर काही खाली राहत होते. पर्थच्या खेळपट्टीवर नंतर भेगाही पडल्या होत्या.


टीमचा अभिमान


पर्थमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय टीमनं ज्या पद्धतीनं पुनरागमन केलं आणि मॅच जिंकली याचा मला अभिमान आहे, असं वक्तव्य विराटनं केलं.


भारतीय त्रिकुटाच्या १३६ विकेट


जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनं यावर्षी १३६ विकेट घेतल्या. याचबरोबर भारताच्या या त्रिकुटानं वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंग, जोएल गार्नर आणि मालकम मार्शलनं १९८४ मध्ये घेतलेल्या १३० विकेटचं रेकॉर्ड मोडलं. यावर्षी टॉप-१० बॉलरमध्ये भारताचे बुमराह, इशांत आणि शमी आहे. बुमराहनं पदार्पणच्या वर्षातच टेस्ट क्रिकेटमध्ये ४८ विकेट घेतल्या. यावर्षी टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या कागीसो रबाडानं केला आहे. रबाडानं यावर्षी ५२ विकेट घेतल्या.