Ex Indian Cricketer Dances With Rashid Khan: दक्षिण आफ्रिकेने चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर सोमवारी ऐतिहासिक कामगिरी केली. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या बलाढ्य संघाला सहज पराभूत केलं. पाकिस्तानविरुद्ध यापूर्वी एकही सामना न जिंकणाऱ्या अफगाणिस्तानने बाबर आझमच्या संघाचा 8 विकेट्स राखून धुव्वा उडवला. भारतीय पाठीराख्यांनी अफगाणी खेळाडूंना दिलेलं समर्थन आणि अफगाणी फलंदाजींनी दाखवलेल्या संयमाच्या जोरावर अफगाणिस्तानने ही ऐतिहासिक कामगिरी केली. भारतामध्ये जवळपास 2 कोटी लोक हा सामना अॅपवरुन लाइव्ह पाहत होते. भारत खेळत नसलेल्या सामन्याला मिळालेली ही सर्वोच्च प्रेक्षक संख्या ठरली. या विजयानंतर अफगाणी चाहत्यांबरोबर मैदानात उपस्थित असलेल्या भारतीयांनीही मोठं सेलिब्रेशन केलं. विशेष म्हणजे भारताचा एक माजी क्रिकेटपटू कॅमेंट्री सोडून मैदानात उतरत राशिद खानबरोबर थिरकल्याचं दिसून आलं.


भारतीय चाहत्यांचा पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानविरुद्ध 7 एक दिवसीय सामन्यांमध्ये पराभूत झालेल्या अफगाणिस्तानने आठव्या सामन्यात पाकिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला. अनेकदा विजयाच्या अगदी जवळ येऊनही हाती अपयश आलेल्या अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्येच पाकिस्तानला पराभूत करणं शक्य झालं. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने विजयी फटका मारल्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने मैदानात धाव घेत जंगी सेलिब्रेशन केलं. अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच पाकिस्तानी खेळाडूंचे चेहरे पडले तर दुसरीकडे अफगाणी खेळाडूंनी एकच जल्लोष केला. चेन्नईच्या मैदानातील प्रेक्षकांनीही अफगाणिस्तानी संघाचं कौतुक केलं. यानंतर अफगाणी संघाने भारतीय चाहत्याचे आभार माननण्यासाठी मैदानाला फेरी मारली. 


भारताच्या माजी क्रिकेटपटूचा राशीदबरोबर डान्स


यावेळी टी-20 मधील सर्वोत्तम गोलंदाज असलेला राशीद खान गळ्यात अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज घालून प्रेक्षकांना अभिवादन करत होता. मध्येच राशीद खान नाचू लागला. त्याला नाचताना पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या कॉमेंट्री करणाऱ्या आणि सामन्यानंतरच्या गप्पांसाठी मैदानात आलेला इरफान पठाणही गाण्यावर थिरकू लागला. दोघांनी सोबत काही वेळ डान्स केला आणि नंतर हसत एकमेकांना मिठी मारली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



...अन् अफगाणिस्तान जिंकला


बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बाबरने 72 धावांची खेळी केली. अबदुल्ला शफीकच्या 58 धावा, शादाब खानच्या 40 धावा आणि इफ्तिकार अहमदच्या 40 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 282 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानच्या रेहमनुतुल्ला गुरबाझने 65 धावा आणि इब्राहिम झार्दानने 87 धावा करत उत्तम सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावांची पार्टनरशीप केली. त्यानंतर रेहमत शाहने नाबाद 77 आणि हशमतुल्ला शाहिदीने नाबाद 48 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. 9 दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आहे.