धोनीच्या निवृत्तीवर आयपीएलच्या माजी अध्यक्षांचं महत्त्वाचं वक्तव्य
धोनीच्या निवृत्तीवर आयपीएलच्या माजी अध्यक्षांचं वक्तव्य
मुंबई : वर्ल्डकप २०१९ ला ७ महिने पूर्ण झाले आहेत. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा सुरु झाली. धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. धोनी निवृत्त होणार का याबाबत चर्चा सुरु असताना आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनी कधी संन्यास घेणार याबाबत त्याने अजून कधीच वक्तव्य केलेलं नाही. धोनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसेल यासाठी चाहते उत्सूक असतात. केएल राहुल सध्या धोनीच्या जागी खेळतो आहे. बीसीसीआयचे माजी सदस्य आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं की, 'महेंद्र सिंह धोनी खूप चांगला खेळाडू आहे. त्याच्यात अजून खूप क्रिकेट बाकी आहे. पण आता हा निर्णय़ त्यालाच घ्यायचा आहे की, तो कधी क्रिकेटला अलविदा करेल.'
न्यूझीलंड विरोधात वर्ल्डकप सेमीफायनल खेळल्यानंतर धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. वर्ल्डकपनंतर त्याने काही सीरीजमध्ये विश्रांती घेतली. मध्ये तो काही वेळ रांचीच्या मैदानावर सराव करताना दिसला पण तो खेळला नाही.
केएल राहुल सध्या चांगली कामगिरी करत आहे. धोनीची जागा त्याने भरुन काढली आहे. केएल राहुल कधी ओपनिंग तर कधी ५ व्या स्थानी खेळतो. पण आता धोनी आयपीएलमध्ये कशी कामगिरी करणार याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
धोनी सध्या क्रिकेट पासून लांब असला तरी तो आयपीएलमध्ये चेन्नई टीमकडून खेळताना दिसणार आहे. धोनी टी२० वर्ल्डकप खेळणार का याबाबत ही अनेकांना प्रश्नचिन्ह आहे.