बीसीसीआयचे माजी सिलेक्टर (BCCI Former Selector) साबा करीम (Saba Karim) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 2004 च्या पाकिस्तान दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) निवड का करण्यात आली नव्हती? याची माहिती त्यांनी दिली आहे. भारतीय संघात स्थान देण्यासाठी आपण धोनीचं नाव सुचवलं होतं. पण तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने त्याचा खेळ पाहिला नव्हता अशी माहिती साबा करीम यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साबा करीम यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ज्याप्रकारे बिहारसाठी खेळत होता ते पाहून आपण चांगलेच प्रभावित झालो होतो. 2003-2004 मध्ये झालेल्या पाकिस्तान दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनीची निवड झाली नव्हती. याउलट 2004 मध्ये त्याने बांगलादेशविरोधात खेळत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच पाकिस्तानविरोधात देशात झालेल्या 2005 मधील मालिकेतही त्याला सहभागी करुन घेण्यात आलं होतं 


"मी जेव्हा धोनीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते त्याचं रणजी ट्रॉफीमधील दुसरं वर्ष होतं. तो बिहारसाठी खेळत होता. मी त्याला फलंदाजी आणि विकेटकीपिंग करताना पाहिलं होतं. मला अद्यापही तो ज्याप्रकारे फलंदाजी करत होता, ते आठवत आहे. फिरकी आणि जलद गोलंदाजांना तो मोठे फटके लगावत होता. त्याच्यात एक अत्यंत कमालीचं हुशारीपण असून ते नंतर सर्वांना दिसलं. विकेटकीपिंग करताना त्याच्या पायाच्या हालचालींमध्ये काही त्रुटी होत्या. आम्ही नंतर त्याच्यासोबत यावर काम केलं. त्याची महानता म्हणजे आम्ही त्याला जे शिकवलं ते अद्यापही त्याच्या लक्षात आहे. जेव्हा कधी आमच्यात बोलणं होतं, तेव्हा तो याबद्दल सांगतो," असं साबा करीम यांनी सांगितलं. 


पुढे ते म्हणाले "महेंद्रसिंह धोनीच्या करिअरमधील हा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. एकदिवसीय सामन्यात आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर पाठवण्यास सुरुवात केली. कारण त्याची फलंदाजी फार जबरदस्त होती आणि तो वेगाने धावा करायचा".


"दुसरा टर्निंग पॉइंट म्हणजे केनियामध्ये भारत ‘अ’, पाकिस्तान ‘अ’ आणि केनिया यांच्यातील तिरंगी मालिका होती. दिनेश कार्तिक राष्ट्रीय संघात सामील झाल्याने एमएस धोनीला खेळण्याची संधी मिळाली कारण. तिथे धोनीने चांगल्या विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीबद्दल तर विचारूच नका! आम्ही पाक 'अ' विरुद्ध दोनदा खेळलो आणि त्याने मालिकेत चांगली फलंदाजी केली," असं साबा करीम यांनी सांगितलं.


"तो त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निग पॉइंट होता आणि त्यानंतर तो एक महान खेळाडू झाला. मला आजही आठवतं मी तेव्हा कोलकातामध्ये होतो. सौरव गांगुली त्यावेळी कर्णधार होती. मी त्याची भेट घेतली आणि सांगितलं की, एक विकेटकिपर आहे ज्याला संघात स्थान दिलं पाहिजे. तो चांगला फलंदाज असून, किपिंगही उत्तम करतो. पण दुर्दैवाने सौरव गांगुलीने धोनीचा खेळ पाहिला नव्हता. त्यानंतर पाकिस्तानचा दौरा झाला आणि धोनीची त्यात निवड होऊ शकली नाही. पण त्यानंतर मात्र त्याला संघात स्थान मिळालं आणि इतिहास रचला," असं साबा करीम यांनी सांगितलं आहे.