बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे ३ टी-२० मॅचची ही सीरिज बरोबरीत सुटली आहे. धर्मशालामध्ये असलेली पहिली टी-२० पावसामुळे रद्द झाली होती. तर मोहालीतल्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा विजय झाला होता. बंगळुरूमधल्या पराभवानंतर मी निराश नसल्याची प्रतिक्रिया विराटने दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय आम्ही मुद्दाम घेतला. टी-२० वर्ल्ड कपआधी आम्हाला हे करुन बघायचं होतं. दक्षिण आफ्रिकेने चांगली बॉलिंग केली. खेळपट्टीनेही पहिल्या इनिंगमध्ये त्यांची मदत केली. टी-२०मध्ये आव्हानाचा पाठलाग करणं सोपं असतं. इतर फॉरमॅटमध्ये तुम्हाला जास्त काळ बॅटिंग करावी लागते आणि पार्टनरशीप करावी लागते. पण टी-२०मध्ये ४०-५० रन करायला फार काळ लागत नाही. जशी आम्हाला संधी मिळेल तसं आम्ही नियोजन आणखी चांगलं करू,' असं विराट म्हणाला.


'ज्या खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यांना आम्ही संधी देत आहोत. आम्ही कोणालाही टीममध्ये घेत नाही. हे खेळाडूं चांगले खेळले आहेत आणि खेळतही आहेत. आम्हाला अशा कठीण मॅच मिळतील. ही एक युवा टीम असल्याचं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल,' असं वक्तव्य विराटने केलं.