IPL 2023 : इतकंही खरं बोलायचं नव्हतं...; फाफ डु प्लेसिसच्या `Ee Sala Cup Nahi` कमेंटवर चाहत्यांनी घेतली मजा
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसचा (Faf Du Plessis) एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पहिल्या सामन्यापूर्वीचा आहे.
Faf Du Plessis Funny Video: आयपीएलमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजची मॅच कोण जिंकतं याकडे लक्ष राहणार आहे, मात्र यापूर्वी बंगळूरूचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसचा (Faf Du Plessis) एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होताना दिसतोय.
ई साला कप नामदे, म्हणताना चुकला फाफ
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसचा (Faf Du Plessis) एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पहिल्या सामन्यापूर्वीचा आहे. या व्हिडीओमध्ये फाफ चुकून आरसीबीचा नारा 'ई साला कप नामदे' (Ee Sala Cup Namde) चुकीच्या पद्धतीने बोलताना दिसतोय. मीडियाशी बोलताना फाफ म्हणाला, 'ई साला कप नही', म्हणजेच 'यंदाच्या वर्षी कप नाही'. फाफचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय.
फाफ डू प्लेसिस हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. गेल्या सिझनपासून रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या कर्णधारपदाची धुरा फाफ ड्यू प्लेसिसकडे सोपवण्यात आली होती. बंगळूचा पहिला सामना या सिझनमध्ये पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
पहिल्या सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फाफ एका मीडिया इव्हेंटचा भाग बनला होता. ज्यामध्ये एका पत्रकाराने फाफला प्रश्न विचारला होता. ज्यावर उत्तर देताना फाफने चूक केली आणि त्याची फजिती झाली. आता या व्हिडीओवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विराटही हसू रोखू शकला नाही
हे वाक्य म्हणण्यापूर्वी विराटने फाफच्या कानात सांगितलं होतं. त्यानुसार, फाफने उत्तर दिलं मात्र तो चुकला. यावेळी बाजूला बसलेल्या विराटला हसू आवरेना. चूक झाल्यानंतर पुन्हा विराटने त्याच्या बरोबर वाक्य सांगितलं आहे.
चाहत्यांनी घेतली मजा
आयपीएलचा यंदाचा हा 16 वा सिझन आहे. या सिझनपूर्वी एकदाही रॉयल चॅलेंजर बंगळूरूला आयपीएलचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळे फाफ ड्यू प्लेसिसच्या या चुकीची चाहत्यांनी मजा घेतली आहे. काही चाहत्यांनी, इतकंही खरं बोलायचं नव्हतं, असं म्हणत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.