`जबरदस्त योगायोग`, झहीर आणि इशांत शर्मा यांचा कसोटीमधील `सेम टू सेम` रेकॉर्ड पाहून चाहते अवाक
Zaheer and Ishant Sharma: भारताच्या उत्तम गोलंदाजांची नावं घेतली जातात, तेव्हा त्यात झहीर खान (Zaheer Khan) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) ही दोन नावं आवर्जून घेतली जातात. दरम्यान या दोन गोलंदाजांची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण दोघांचीही कसोटीमधील आकडेवारी सारखीच असून चाहतेही अवाक झाले आहेत.
Zaheer Khan and Ishant Sharma: भारतीय संघाने क्रिकेटविश्वाला अनेक महान गोलंदाज दिले आहेत. आपल्या जबरदस्त कामगिरीने या गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करत जागतिक क्रिकेटला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. यापैकी दोन गोलंदाज म्हणजे इशांत शर्मा आणि झहीर खान. भारताच्या उत्तम गोलंदाजांचा उल्लेख होतो तेव्हा झहीर खान (Zaheer Khan) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. पण एका उत्तम गोलंदाजासह त्यांच्यात आणखी एक साम्य आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
झहीर आणि इशांत शर्मा यांची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण दोघांचीही कसोटीमधील आकडेवारी सारखीच असून चाहतेही अवाक झाले आहेत. दोघांनीही कसोटीत सारखेच सामने खेळले असून तितकेच विकेट घेतले आहेत. इतकंच नाही तर 5 आणि 10 विकेट घेण्याचा विक्रमही सारखाच आहे. तसंच भारतात आणि भारताबाहेर केलली कामगिरीही अगदी समान आहे.
भारत आणि वेस्ट-इंडिजमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ब्रॉडकास्टरने ही आकडेवारी दाखवली असता काही मिनटातच फोटो व्हायरल झाला. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून, क्रिकेट चाहत्यांचा तर विश्वासच बसत नाही आहे. एका चाहत्याने 'अविश्वसनीय योगायोग' असं लिहिलं आहे. तर एका चाहत्याने म्हटलं आहे की, 'याचा अर्थ जर आपण झहीर खानचा आदर करत असू, तर तितकाच आदर इशांत शर्मालाही दिला पाहिजे'.
दरम्यान एका चाहत्याने, ही समानता नसून, अगदीच सारखं आहे अशी कमेंट केली आहे. तर एकाने दोघंही महान खेळाडू असल्याचं सांगितलं आहे.
वेस्ट इंडिजविरोधातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. पोर्ट ऑफ स्पेन मैदानात हा सामना पार पडला. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने दुसरा सामना जिंकण्यासाठीही फार प्रयत्न केले. भारताने आक्रमक फलंदाजी केली तर दुसरीकडे चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजने करिअरमधील सर्वात चांगली गोलंदाजी केली.
मोहम्मद सिराजने चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचे 5 विकेट्स मिळवत आपल्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद केली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिज संघ 255 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजने दिवसाचा खेळ 229 धावांवर 5 गडी बाद यावर सुरु केला होता. पण नंतर ते फक्त 26 धावा करु शकले.
भारताकडे 183 धावांची आघाडी होती. यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळी करत 24 ओव्हरमध्ये 181 धावा केल्या. टी-ब्रेकच्या 35 मिनिटं आधी भारताने डाव जाहीर करत वेस्ट इंडिजला 365 धावांचं आव्हान दिलं. चौथ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने 32 ओव्हर्समधअये 76 धावा केल्या होत्या. सामना जिंकण्यासाठी त्यांना 289 धावांची गरज होती. पण पावसाने व्यत्यय आणल्याने पाचव्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला.