FIFA World Cup 2018 : ...म्हणून `या` भारतीय चाहत्याने घराला अर्जेंंटीनाच्या रंगात रंगवले
अवघ्या काही दिवसांवर फीफा वर्ल्ड कप 2018 येऊन ठेपला आहे.
कोलकत्ता : अवघ्या काही दिवसांवर फीफा वर्ल्ड कप 2018 येऊन ठेपला आहे. क्रिकेट हा धर्म मानला जाणार्या भारतामध्ये फुटबॉलचेही चाहते आहेत. अर्जेंटीनाच्या हजारो समर्थकांपैकी एक शिवशंकर पात्रा हा एक जबरा फॅन आहे. 53 वर्षीय पात्रादेखील यंदा फीफा वर्ल्डकपसाठी सज्ज झाले आहेत. मेस्सीचे चाहते असलेल्या या जबरा फॅनने अर्जेटीना संघाला साथ देण्यासाठी पहा काय अजब प्रकार केला आहे..
चहाविकेता शिव शंकर पात्रा
व्यवसायाने चहा विक्रेते असणारे शिव शंकर पात्रा यांनी काटकसर करून पैसे वाचवले. यंदा फीफा वर्ल्ड कप रशियात स्टेडियममध्ये बसून पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्याकडे केवळ 60,000 रूपये जमले होते. या पैशात फीफ़ा रशियात जाऊन पाहणं शक्य नसल्याचे ट्रॅव्हल एजेन्टने सांगितले. पैशाअभावी हिरमुसून न जाता त्यांनी चक्क आपल्या तीन मजली घराला अर्जेटीना संघाच्या रंगात रंगवले आहे.
मेस्सीचा चाहता
पात्रा मेस्सीचे चाहते आहेत. " मला दारू, धुम्रपानाचे व्यसन नाही पण अर्जेटीना संघ आणि मेस्सीच्या खेळाचे मात्र व्यसन आहे. मी फार पैसे कमावत नाही परंतू वर्ल्डकप दरम्यान या खेळासाठी मुबलक स्वरूपात पैसे साठवून ठेवण्याचा मी नक्की प्रयत्न करतो. " अशा भावना पात्रा यांनी व्यक्त केल्या आहेत.
आगळीवेगळी ओळख
'अर्जेटीना चहाचे दुकान' अशी पात्रांच्या दुकानाची ओळख आहे. पात्रा यांच्या चहाच्या दुकान आणि घराच्या आसापास अर्जेटिना संघाचा झेंडा आहे. घराला , चहाच्या दुकानाला अर्जेटीनाचा रंग आहे. तर देवघराच्या जागेत चक्क मेस्सीचा फोटो आहे.
अर्जेटीनाच्या मॅच दरम्यान मोफत चहा समोसे
शिवशंकर पात्रासोबतच त्याचे कुटुंबीयदेखील मेस्सीचे फॅन आहेत. सारे कुटुंबीय ना चुकता अर्जेंटीना संघाची मॅच बघतात. 2012 पासून हे कुटुंबीय मेस्सीचा वाढदिवसदेखील साजरा करतात. दरवर्षी मेस्सीच्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. मात्र यंदा मॅच दरम्यान मेस्सीचा वाढदिवस येत असल्याने रक्तदान शिबीर रद्द करण्यात आले आहे. मात्र अर्जेटीनाच्या मॅचदिवशी ग्राहकांना मोफत चहा आणि समोसे देण्याचा पात्रांचा मानस आहे. यंदा 30 पाऊंडचा केक आणि मेस्सीच्या अर्जेटीना संघाच्या जर्सीचे 100 जणांसोबत वाटप करण्यात येणार आहे.