नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये आयोजित 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ट्रायलमध्ये सुशील आणि कुस्तीपटू प्रवीण राणा या दोघांच्या समर्थकांमध्ये के. डी. जाधव स्टेडियमवर शुक्रवारी हा प्रकार घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवीणचे भाऊ नवीन राणा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला. सुशील आणि समर्थकांवर भारतीय दंड विधान कलम 323 आणि 341 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमान्वये दोषी ठरल्यास, एक वर्षाची शिक्षा, एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही लागू केले जाऊ शकते.


राणा यांनी म्हटलं की, सुशील आणि समर्थकांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे आणि आगामी प्रो रेसलिंग लीगमध्ये भाग न घेण्याची धमकी दिली आहे. सुशील यावर्षी प्रो रेसलिंग लीगमध्ये सहभागी होत आहेत.


राणा सुशीलच्या विरोधात रिंगणात उतरल्याने सुशीलच्या समर्थकांनी त्याला मारहाण केली. सुशीलने राणाला उपांत्य फेरीत पराभूत केले. परंतु यानंतर सुशीलच्या समर्थकांनी राणा आणि त्याचा मोठा भाऊ यांच्यावर हल्ला केला. असं त्यांचा आरोप आहे.