पहिली टी-२० : न्यूझीलंडची मोठी धावसंख्या, भारतासमोर खडतर आव्हान
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये न्यूझीलंडनं मोठी धावसंख्या उभारली आहे.
वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये न्यूझीलंडनं मोठी धावसंख्या उभारली आहे. २० ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं ६ विकेट गमावून २१९ रन केल्या आहेत. यामुळे भारताला विजयासाठी २२० रनचं खडतर आव्हान मिळालं आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या टीम सायफर्टनं ४३ बॉलमध्ये ८४ रनची विस्फोटक खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता. कॉलीन मुन्रोनं २० बॉलमध्ये ३४ आणि कर्णधार केन विलियमसननं २२ बॉलमध्ये ३४ रनची खेळी केली.
भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, कृणाल पांड्या आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. भारताच्या प्रत्येक बॉलरनं त्याच्या निर्धारित ४ ओव्हरमध्ये खोऱ्यानं रन दिल्या, त्यामुळे न्यूझीलंडला एवढ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.
भारताचं न्यूझीलंडमधली आत्तापर्यंतची टी-२० कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आत्तापर्यंत भारताला न्यूझीलंडच्या मैदानात एकही टी-२० मॅच जिंकता आलेली नाही. वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंडचा ४-१नं पराभव केल्यानंतर आता टी-२० सीरिजला सुरुवात झाली आहे. वनडे सीरिजमधला हा आत्मविश्वास कायम ठेवण्याचं आव्हान भारतीय टीमपुढे असणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला हा सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विराटऐवजी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व आहे.