दुबई : इंडियन प्रीमियर लीगचा शेवटचा लीग सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबईने जिंकला पण त्यांचं प्लेऑफमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान या सामन्यात हैदराबादच्या एका खेळाडूने एक आश्चर्यकारक विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएल सामन्याच्या एका डावात सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम सनरायझर्सचा खेळाडू मोहम्मद नबीच्या नावावर झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2021च्या 55 व्या सामन्यात नबीने आपल्या फिल्डींगच्या जोरावर हा विक्रम घडवला. नबीने या सामन्यात एकूण 5 कॅच घेतलेत. कोणत्याही आयपीएल सामन्याच्या एका डावात कोणत्याही फिल्डरकडून घेतलेले सर्वाधिक कॅच आहेत. असा विक्रम करणारा नबी एकमेव खेळाडू आहे.


या खेळाडूंचे टिपले कॅच


आयपीएलच्या एका डावात 5 झेल घेणारा मोहम्मद नबी पहिला फिल्डर ठरला आहे. नबीने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जेम्स नीशन, कृणाल पंड्या आणि नॅथन कुल्टर-नाईल या 5 जणांचे कॅच घेतले आहेत. यापूर्वी विकेटकीपर म्हणून कुमार संगकाराने 2011 मध्ये एका डावात पाच कॅच घेतले होते. त्यावेळी त्याने ते डेक्कन चार्जर्ससाठी घेतले होते. कुमार संगकाराने आरसीबीविरुद्ध ही आश्चर्यकारक कामगिरी केली होती.


यंदाच्या सीजनमध्ये नबीचं प्रदर्शन


या सामन्यात कर्णधार केन विल्यमसनच्या जागी नबीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं होतं. विल्यमसन पूर्णपणे फिट नव्हता. त्याच्या जागी मनीष पांडेला टीमची कमान देण्यात आली. 


सनरायझर्सची कामगिरी यंदाच्या सिझनमध्ये फारच निराशाजनक आहे. पॉईंट्स टेबलमध्ये ही टीम तो शेवटच्या क्रमांकावर आहे. या हंगामात नबीने एकूण तीन सामने खेळले आणि 34 धावा केल्या. त्याचप्रमाणे तीन बळी घेतले. त्याने आयपीएलमध्ये 17 सामने खेळले आहेत आणि 180 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याच्या खात्यात 13 विकेट्सची नोंद आहे.