IPL 2024: मुंबई इंडियन्स संघाची अपयशाची मालिका अद्याप सुरु आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनऊने मुंबईचा 4 गडी राखून पराभव केला. यासह खालच्या स्तरावर असणारा मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत अद्यापही वरती येऊ शकलेला नाही. दरम्यान मुंबई इंडियन्स संघ दोन गटात विभागला गेला असून, त्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे असा मोठा दावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने केला आहे. तसंच मोठ्या स्पर्धा जिंकणे वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कार्यावर जास्त अवलंबून असतं असं मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल हंगामाला सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलला होता. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवत गुजरातमधून ट्रेड करण्यात आलेल्या हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. कर्णधार बदलल्यानंतर चाहत्यांनी प्रचंड नाराजी जाहीर केली होती. त्यात मुंबई इंडियन्सच्या कामगिरीने यात भर टाकली आहे. मुंबई इंडियन्सला आता प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी उर्वरित सर्व 5 सामने जिंकावे लागणार आहेत. 


"ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील की नाही याबाबत मला कल्पना नाही. मुंबई इंडियन्स संघाला सकारात्मक विचार ठेवावा लागेल. पण मला वाटतंय मैदानात जे दिसत आहे, त्याच्या व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स संघात बरंच काही सुरु आहे. तुमच्याकडे इतके चांगले खेळाडू असताना, सतत इतकी वाईट कामगिरी करु शकत नाही," असं मायकल क्लार्कने म्हटलं आहे.


"त्यामुळे मला वाटत आहे की, चेंजिंग रुममध्ये एकापेक्षा जास्त गट आहेत. त्यांच्यात काहीतरी बिनसलं आहे, ते एकत्रित येत नाही आहेत आणि संघ म्हणून खेळताना दिसत नाही आहेत," असं मायकल क्लार्कने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाईव्हशी संवाद साधताना म्हटलं.


रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे सामने जिंकून देणारे खेळाडू असतानाही मुंबई इंडियन्स संघ या हंगामात अपयशी ठरला आहे. 9 सामन्यांपैकी 6 सामने त्यांनी गमावले आहेत. या तीन विजयांपैकी दोनमध्ये गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि तिसऱ्यात रोमारिओ शेफर्ड याचा हातभार होता. 


"एखाद्या खेळाडूची वैयक्तिक कामगिरी त्यांना अनपेक्षित निकाल देऊ शकते. जर रोहित शर्माने आणखी एखादं शतक ठोकलं किंवा हार्दिकने फलंदाजीत कमाल केली किंवा बुमराहने चतुराईने गोलंदाजी केली तर काहीतरी चमत्कार होऊ शकतो," असं मायकल क्लार्कने सांगितलं आहे.


पुढे त्याने म्हटलं आहे की, "मोठ्या स्पर्धा जिकण्यासाठी फक्त एकट्याने कामगिरी करुन काही होत नाही, तुम्ही संघ म्हणून खेळावं लागतं. दुर्दैवाने ते संघ म्हणून खेळले नाही आणि आता त्यात ते बदल करतील अशी आशा आहे. पण मला ते जिंकतील असं वाटत नाही".