मुंबई : न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सची प्रकृती चिंताजनक आहे. ख्रिसला ऑस्ट्रेलियातील कॅनाबेरा येथील एका रुग्णालयामध्ये लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. ख्रिस नुकताच एका ठिकाणी ख्रिस घसरुन पडल्याने  जखमी झाला हे वृत्त ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५१ वर्षीय ख्रिसवर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रीय झाल्या असून त्याची प्रकृती मागील काही काळापासून चिंतेचा विषय राहिली आहे. ख्रिसला हृदयासंदर्भातील अनेक समस्या असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आल्या होत्या. मात्र या शस्त्रक्रीयांना त्याच्या शरीराने म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने दिवसोंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली, अशी माहिती न्यूजहब या वृत्तसंस्थेने दिली होती.



ख्रिसला ऍरोटीक डायसेक्शन त्रास झाला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हृदयातील मुख्य धमणीला इजा झाली आहे. ख्रिसच्या प्रकृतीसंदर्भात न्यूझीलंडमधील खेळाडूंच्या संघटनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ख्रिसच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. 


ख्रिसची कारकिर्द 


ख्रिसने न्यूझीलंडकडून ६२ कसोटी आणि २१५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच तो देशासाठी दोन टी-२० सामनेही खेळला आहे. १९८९ ते २००६ दरम्यान त्याने न्यूझीलंडकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून समाधानकारक कामगिरी केली. नंतर तो कॉमेंट्रेटर म्हणून काम करायचा. आपल्या कालावधीमध्ये ख्रिस हा सर्वोच्च अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. विशेष म्हणजे त्याचे वडील लान्स हे सुद्धा न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळले आहेत. न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही ख्रिसच्या खासगी आयुष्यासंदर्भात आम्ही कोणतंही भाष्य करणार नसल्याचं म्हटलं आहे.


ख्रिसवर मॅच फिक्सिंगचा आरोप


२००८ साली भारतात खेळवण्यात आलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंढीगड लायन्स संघाकडून खेळताना मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले. त्याने यासंदर्भात कायदेशीर लढाईही लढली आहे.


२०१४ मध्ये साफसफाई कामगार म्हणून केलंय काम 


२००८ नंतर ख्रिस २०१४ रोजी चर्चेत आला होता. उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ख्रिस केर्न्सला बस डेपोंची साफसफाईचे काम करावे लागत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मॅच फिक्सिंगच्या आरोपांवरुन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केल्यानंतर ख्रिसच्या मागे न्यायालयीन चौकशी ससेमिरा सुरु झाला. न्यायालयीन लढाईचा खर्च, गोठवलेली बँक खाती यामुळे दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठीही ख्रिसला साफसफाई कामगार म्हणून काम करावं लागलं. तो ऑकलंड कौन्सिलमध्ये बस डेपोच्या साफसफाईचे काम करायच्या ज्यासाठी त्याला ताशी १७ डॉलर पगार मिळत असे.