मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून नेमण्यात आलेल्या समितीकडून भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठीचे अर्ज मागवण्यात आले आहेत. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांच्या समितीच्या निरिक्षणाअंतर्गत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या सूत्रांनी 'आयएएनएस'ला दिलेल्या माहितीनुसार निवड प्रक्रियेसाठी या तिघांचीही निवड अद्यापही करण्यात आली नसून, अद्यापही त्याविषयीच्या चर्चा सुरु आहेत. शिवाय याविषयी कोणतीच अधिकृत चर्चा झाल्याची माहितीही समितीतील एका सदस्याकडून मिळाली आहे. 'संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आणि माझ्या हाती अधिकृत पत्रक आल्यानंतरच मी माझी भूमिका आणि पदभाराविषयी माहिती देईन', अशी माहिती संबंधित व्यक्तीकडून देण्यात आली आहे. 


क्रिकेट विश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षपदासाठी अर्ज मागवले आहेत. ज्यामध्ये प्रमुख प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यासाठी काही आवश्यक निकष ठेवले गेले आहेत. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने भारतीय संघाकडून किंवा आयपीएल स्पर्धेत किमान तीन वर्षे खेळल्याचा अनुभव पाहिजे. याखेरीज त्या माजी खेळाडूला ३० कसोटी किंवा ५० एकदिवसीय सामने खेळल्याचा अनुभव असणं अनिवार्य आहे. 


अर्ज करणारी व्यक्ती ही ६० वर्षांहून कमी वयाची असावी, असंही या निय़मावलीत नमुद करण्यात आलं आहे. प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ही ३० जुलै आहे. सध्या कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना प्रशिक्षकपदासाठीच्या प्रक्रियेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे येत्यआ काळात संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे भारतीय क्रीडा आणि विशेष म्हणजे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेल असेल. 


रवी शास्त्री यांचा कार्यकाळ वाढवला 


सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी असणाऱ्या रवी शातस्त्री यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यामुळे ४५ दिवसांनी हा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. परिणामी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिज दौरा संपल्यानंतर शास्त्रींचा कार्यकाळही संपेल.