भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. सध्या सुरु असणारे क्रिकेट सामने, खेळाडूंची कामगिरी यावर ते एक्सच्या माध्यमातून भाष्य करत मत मांडत असतात. यादरम्यान काही वेळा त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोलही केलं जातं. पण लक्ष्मण शिवरामकृष्णन त्यांना उत्तर देत बोलती बंद करत असतात. नुकतंच एका नेटकऱ्याने त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केली असता त्यांनी त्यालाही शांतपणे सणसणीत उत्तर दिलं. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी एक्सवर तामिळनाडूच्या महालिंगापूरम येथील अय्यप्पन मंदिरातील एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्यांच्या मागे एक हत्ती दिसत आहे. यावर एका युजरने कमेंट करत लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना ट्रोल केलं. 'हाय सर, रात्री हत्ती तुमच्यापेक्षा जास्त दिसेल', अशी वर्णद्वेषी कमेंट त्याने केली. 



यावर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना त्याला सडेतोड उत्तर दिलं. 'हो मी काळा आहे,' असं त्यांनी युजरला सांगितलं. तसंच पुढे म्हटलं की, "हा मंदिरातील एक सण आहे. तुम्ही लोक फार चीप आहात". यानंतर ट्रोल करणाऱ्याने त्यावरही काही कमेंट केल्या होत्या. पण नंतर त्याने हे ट्वीट डिलीट करुन टाकले. यावेळी काहींना त्यांना अशा युजर्सला उत्तर न देण्याचा सल्ला दिला. 



आऱ अश्विनवर व्यक्त केली होती नाराजी


भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेदरम्यान लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी भारताचा फिरकी गोलंदाज आऱ अश्विनवर नाराजी जाहीर केली होती. आपण 100 वा कसोटी सामना खेळणार असल्याने अभिनंदन करण्यासाठी आर अश्विनला फोन, मेसेज केले असता त्याने साधं उत्तर देण्याची तसदीही घेतली नसल्याचा दावा त्यांनी केला होता. 


त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "100 व्या कसोटी सामन्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी काही वेळा फोन केला. पण त्याने फोन कट केला. त्याला मेसेजही पाठवले, पण उत्तर आलं नाही. आम्ही माजी क्रिकेटपटूंना हा असा आदर मिळत आहे".


त्यांच्या या पोस्टवर एका युजरने त्यांना त्यांच्या कामगिरीची आठवण करुन दिली होती. एका युजरने आर अश्विनशी तुलना करत तुम्ही फक्त 26 विकेट्स घेतल्याची आणि आर अश्विनने 507 विकेट्स घेतल्याचं सांगितलं. त्यावर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी त्यालाही उत्तर दिलं. "तू आयुष्यात काय मिळवलं आहेस? आदर हा नेहमी सुसंस्कृत लोकांकडूनच मिळतो. मी याआधी त्याच्या अॅक्शनमध्ये एक सुधारणा सांगत होतो, टीका करत नव्हतो. जर लोकांना समजत असेल तरच," असं त्यांनी सुनावलं. तसंच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं आहे का? 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने...अशी विचारणाही त्यांनी केली.