`कसोटीत कधीच त्यांनी ...,` विराटचं कौतुक करताना भारताच्या खेळाडूने सचिन, गांगुलीला सुनावलं, `खरा चॅम्पिअन...`
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्यानंतर माजी खेळाडूने त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना टोला लगावला.
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला होता. नेहमी चौथ्या क्रमांकावर खेळणारा विराट वरच्या क्रमांकावर आल्याने माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना टोला लगावला आहे.
2024 मध्ये विराट कोहलीचा कसोटीमधील खराब फॉर्म कायम आहे. न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. शुभमन गिलच्या अनुपस्थितीमुळे विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला होता. त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी कोहलीच्या नेहमीच्या क्रमांक 4 च्या स्थानाचा त्याग करण्याच्या निर्णयाचे स्वागत केलं. तसंच हीच गोष्टी विराट कोहलीला सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली सारख्या माजी खेळाडूंपासून वेगळं करते असंही म्हटलं. सचिन आणि सौरव गांगुलीने कधीच कसोटी क्रिकेटमधील आपलं स्थान सोडलं नाही असा त्यांचा दावा आहे.
संजय मांजरेकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत, 'हॅट्स ऑफ विराट कोहली' असं म्हटलं आहे. "हॅट्स ऑफ टू विराट कोहली! तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणे संघाला आवश्यक होते. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ओपनिंग करायला खूप उत्सुक होते, पण कसोटीत कधीच वरच्या क्रमांकावर येण्याची ययारी नव्हती. हाच तुमच्यासाठी खरा चॅम्पियन आहे! विराट," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पण संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक शैली दाखवल्याने नाराजी व्यक्त करत टीका केली. गेल्या काही सामन्यांपासून या खेळीमुळे त्याच्या समस्या वाढल्या असल्याचं म्हटलं.
"मी हे आधी सांगितलं असून पुन्हा सांगेन. विराटने प्रत्येक चेंडूवर फ्रंटफूटवर खेळण्याचा प्रयत्न करत त्याच्या समस्या वाढवल्या आहेत. लांबीचा काही फरक पडत नाही. आज तो ज्या चेंडूवर बाद झाला तो सहज टोलवता आला असता," असं मत त्यांनी मांडलं आहे.
मांजरेकरांचा दावा कितपत खरा आहे?
सचिन तेंडुलकरने कसोटीत चौथ्या क्रमांकावर खेळताना एकूण धावांपैकी 85 टक्के धावा केल्या आहेत. तर क्रमवारीतील पहिल्या तीन स्थानांपैकी कोणत्याही एका स्थानावर केवळ 15 धावा केल्या.
दुसरीकडे, गांगुलीच्या 7,212 कसोटी धावांपैकी 752 धावा तिसऱ्या क्रमांकावर खेळताना केल्या आहेत. तर सलामीवीर म्हणून केवळ 11 धावा आहेत. गांगुली त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. पण राहुल द्रविडने नंतर ही जागा घेतली आणि अदगी योग्य खेळी करत ती कायम केली.