मुंबई :  भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि या क्रीडा जगतात १९८३ च्या क्रिकेट विश्वचषकावर भारताची मोहोर उमटवणाऱ्या कपिल देव यांचा आदर्श अनेकांनीच ठेवला. खेळाकडे पाहण्याची किंबहुना हा खेळ जगण्याची त्यांची वृत्ती इतरांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक खेळाडू म्हणून कपिल देव यांनी नेहमीच क्रीडारसिकांची मनं जिंकली. सोबतच त्यांची सेकंड इनिंगही विशेष प्रभावशाली ठरली. क्रिकेटप्रती अपार निष्ठा असतानाही क्रिकेटच सर्वकाही नव्हे, हा विचार एका प्रसंगी त्यांच्या मनात आला आणि कपिल देव यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' नावाच्या एका कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयीची माहिती दिली. यावेळी त्यांनी एक आठवणही सांगितली.


'जेव्हा मी कसोटी क्रिकेट खेळत होतो तेव्हा चंदू बोर्डे हे भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक होते. ते स्वत: एक माजी क्रिकेटपटूही होते. त्याचवेळी मुंबईत एक कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला ज्यानंतर चंदू बोर्डे यांनी आपण पुण्याला जात असल्याचं सांगितलं. पुढच्या कसोटी समन्यात भेटू असं सांगून ते निघाले. पण, जवळपास तीन तासांनंतरही चंदू बोर्डे त्याच ठिकाणी होते', असं कपिल देव त्या प्रसंगाविषयी सांगत म्हणाले.


बोर्डे यांना त्याच ठिकाणी पाहिल्यानंतर 'तुम्ही अजूनहपर्यंत गेला नाहीत का?' असा प्रश्न देव यांनी विचारला. त्यावर, 'सेक्रेटरी बोर्डातील एक व्यक्ती झोपली असल्यामुळे ते उठल्यानंतरच मला दैनंदिन भत्ता मिळेल आणि त्यानंतरच मी जाऊ शकेन', असं ते म्हणाले. बोर्डे यांच्या त्या एकाच वक्तव्याने आपलं आयुष्य पुरतं बदलल्याचं कपिल देव यांनी या मुलाखतीत सांगितलं. 


एकेकाळी नावाजलेले क्रिकेटपटू असणाऱ्या बोर्डे यांना त्या क्षणाला निवृत्तीनंतर दैनंदिन भत्त्यासाठीदेखील वाट पाहावी लागत होती. त्याच क्षणाला क्रिकेटच सर्वकाही नसल्याच्या विचाराने डोकं वर काढलं. कारण, क्रिकेट विश्वातून काढता पाय घेतल्यानंतरचा काळ किंवा बोर्डे यांच्याप्रमाणे आपल्यालाही अशा प्रसंगाचा सामना करावा लागू शकतो ही वस्तुस्थिती त्यांच्या डोळ्यांसमोर उभी ठाकली होती. हे खरंतर अत्यंत वाईट आहे, असं म्हणत देव यांनी एक खेळाड म्हणून आपली भूमिका मांडली. 


कोणताही खेळाडू जेव्हा खेळात सक्रिय असतो तेव्हा मात्र त्यांच्या तुमच्या राहणीमानात बराच बदल आलेला असतो. पण, याच खेळातून काढता पाय घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. राहणीमान बदलतं, स्वभावात कटुता येते, अनेकदा आनंदापासून व्यक्ती दुरावते. त्यामुळेच आपण सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतरच एका नव्या उद्योगाकडे वळल्याचं देव यांनी स्पष्ट केलं.