`मी रात्री यापेक्षा जास्त खर्च करतो,` विरेंद्र सेहवागचं उत्तर ऐकून गिलक्रिस्ट पाहतच राहिला; `आम्ही गरीब देशांमध्ये...`
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपल्याला एकदा बीबीएल फ्रँचाईजीकडून (BBL franchise) ऑफर मिळाली होती असा खुलासा केला आहे. पण जास्त पैसे देत नसल्याने आपण ती ऑफर नाकारली असं त्याने सांगितलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) आजही सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखलं जातं. टी-20 क्रिकेट सुरुही झालं नव्हतं, त्याच्याही आधीपासून विरेंद्र सेहवाग स्फोटक फलंदाजी करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तर त्याने तिहेरी शतक ठोकलं असून, क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णक्षरात आपल्या नावाची नोंद केली आहे. सध्या जगभरातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असताना एक वेळ अशी होती जेव्हा विरेंद्र सेहवाग आपल्या संघात असावा अशी अनेक संघांची इच्छा होती. अनेकांना माहिती नाही, पण सेहवागला ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगमध्ये खेळण्याची ऑफर देण्यात आली होती. सेहवागने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ॲडम गिलक्रिस्टसोबतच्या (Adam Gilchrist) चर्चेत खुलासा केला की त्याला BBL फ्रँचायझीने एकदा 100,000 डॉलर्सची ऑफर दिली होती. पण त्याने ती ऑफर नाकारली.
या चर्चेदरम्यान गिलक्रिस्टने विरेंद्र सेहवागला भारतीय खेळाडू कधी बिग बॅश लीगमध्ये खेळतील का? अशी विचारणा केली. यावर विरेंद्र सेहवागने उपहासात्मकपणे उत्तर देताना भारतीय खेळाडूंकडे फार पैसे असल्याने गरज नाही असं म्हटलं.
ॲडम गिलक्रिस्टने तुला भविष्यात भारतीय खेळाडू इतर टी-20 स्पर्धांमध्ये खेळताना दिसतील असं वाटतं का? अशी विचारणाही केली. यावर सेहवागने हसत उत्तर दिलं की, 'नाही, गरज नाही. आम्ही श्रीमंत लोक आहोत, आम्ही गरीब देशांमध्ये जात नाही'. यानंतर सेहवागने आपण एकदा बीबीएलची ऑफर नाकारली होती असा खुलासाही केला.
"आम्हाला गरज नाही, आम्ही श्रीमंत आहोत. आम्ही दुसऱ्या लीगमध्ये खेळण्यासाठी गरीब देशांमध्ये जात नाही. मला आजही आठवतं की, भारतीय संघातून मला वगळण्यात आलं होतं. मी आयपीएल खेळत होतो. यादरम्यान मला बिग बॅशमध्ये सहभागी होण्यासाठी बीबीएलकडून ऑफर आली. मी म्हटलं ठीक आहे, किती पैसे देणार. त्यांनी सांगितलेली रक्कम ऐकून मी म्हटलं, इतके तर मी माझ्या सुट्ट्यांवर खरेदी करतो. माझं काल रात्रीचं बिल यापेक्षा जास्त होतं," असा खुलासा सेहवागने केला आहे.
विरेंद्र सेहवाग सध्या क्रिकेट पंडित, समालोचक म्हणून आपली कारकीर्द पुढे नेत आहेत. आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेताना त्याने आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ कसा असावा यासंबंधी मतही मांडलं आहे. यशस्वी जयस्वालला भारतीय संघात स्थान मिळावं असं विरेंद्र सेहवागचं म्हणणं आहे.