बांगलादेशने कसोटी मालिकेत 2-0 ने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. पाकिस्तान संघासाठी तुलनेने दुबळ्या संघाकडून पराभव स्विकारणं फारच लाजिरवाणं ठरलं आहे. विशेष म्हणजे बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानचा कसोटीत पराभव केला आहे. घऱच्या मैदानावर पाकिस्तान संघ पराभूत झाल्याने ही नाराजी आणखीन वाढलेली आहे. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघावर आधीपासूनच टीका होत होती. या पराभवाने त्यांना टीकेचा धनी केलं आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलमान बटसह अनेक तज्ज्ञांनी संघाला लक्ष्य केलं आहे. काही तज्ज्ञांनी पाकिस्तानी फलंदाजांना त्यांचा स्ट्राईक रेट वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यावर मात्र सलमान बट असहमत असून त्याने तज्ज्ञांनाच सुनावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"स्ट्राईक रेट माफिया आणि हेतू माफिया हे क्रिकेटमधील निरक्षर आहेत. त्यांना आपण कोणत्या फॉरमॅटबद्दल बोलत आहोत याची काहीच माहिती नाही," असं सलमान बटने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं. "तुम्ही फक्त चार दिवसांत पराभूत होऊन, माघारी फिरता. वेगाने खेळत नेमकं तुम्ही काय करणार आहात? तुम्ही फक्त 46 ओव्हर्स खेळलात. तुम्हाला नेमकी घाई कसली आहे? तुमचं काम जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवर टिकणं आहे हे तुम्हाला समजत का नाही?," असा संताप त्याने व्यक्त केला आहे. 


"महान खेळाडू हायलाईट्स दाखवल्याप्रमाणे खेळतात का? जो रुट, विराट कोहली, रोहित शर्मा अशाप्रकारे धावा करतात का?", अशी विचारणा सलमान बटने केली आहे.


ताज्या ICC कसोटी क्रमवारीत पाकिस्तानने तळ गाठला असून आठव्या स्थानावर पोहोचली आहे. 1965 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान संघ या स्थानावर आला आहे. पाकिस्तान संघाला एकामागून एक धक्के बसत असतानाच मायदेशात बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील व्हाईटवॉशने त्यात भर टाकली आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत पाकिस्तानने पराभवाची चव चाखण्याची ही पहिलीच घटना होती.


आयसीसी क्रमवारीत पाकिस्तान संघ आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्थानावर असताना आगामी काळात त्यांचे जास्त कसोटी सामने नसल्याने ती सुधारण्याची संधी नाही. बांगलादेशविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात एकीकडे पाकिस्तानी फलंदाजांनी गुडघे टेकले असताना बांगलादेशचे फलंदाज मात्र आक्रमक फलंदाजी करत होता. 


पाकिस्तान संघाला खेळपट्टी समजणं फार कठीण जात होतं. यामुळे बांगलादेशने 10 गडी राखून त्यांचा पराभव केला. दुसऱ्या सामना सहा विकेट्सने जिंकत बांगलादेशन कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. 


निकालाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्टँडिंगचं संपूर्ण चित्रच बदललं आहे. 2-0 ने मालिका जिंकून बांगलादेशने 45.83 पॉइंट टक्केवारीसह इंग्लंडला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. दरम्यान, सात सामन्यांतील दोन विजयांसह पाकिस्तान 19.05 गुणांच्या टक्केवारीसह आठव्या स्थानावर घसरला आहे.