`जर भारताशिवाय खेळलात...`, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनेच PCB ला दिला इशारा; 844 कोटींचा उल्लेख करत म्हणाला, `एक तर...`
चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारताच्या सहभागावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचं नाही असा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड पद्दतीने खेळण्यास नकार देत आहे.
चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारतीय संघाच्या सहभागावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघाने आपण स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये खेळवत हायब्रीड मॉडेल राबवू शकतो असा प्रस्ताव ठेवला आहे. पण पाकिस्तानने हा प्रस्ताव फेटाळला आहे. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) हे दोन्हीही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे या स्पर्धेचं भवितव्य नेमकं काय असेल याबाबत स्पष्टता नाही. यादरम्यान पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीला (International Cricket Council) इशारा दिला आहे. जर भारताशिवाय चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळली गेली तर 844 कोटींचं नुकसान होईल याची आठवण त्याने करुन दिली आहे.
"जर पाकिस्तान भारतीय संघाला आपल्या देशात किंवा तटस्थ ठिकाणी आणण्यात अपयश ठरला तर दोन गोष्टी होतील. सर्वात प्रथम म्हणजे आपण 844 कोटी गमावू जे आयसीसी आणि यजमान देशाला स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मिळतात. दुसरं म्हणजे जर भारतीय संघ पाकिस्तानात आला आणि लाहोरमध्ये खेळला तर फार बरं होईल. मग निकाल काहीही असो," असं शोएब अख्तरने पाकिस्तानमधील चॅनेलशी संवाद साधताना सांगितलं.
सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने पाकिस्तानला जाण्याची परवानगी नाकारल्यामुळे भारतीय अंध क्रिकेट संघ T20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार नाही, असं राष्ट्रीय महासंघाने मंगळवारी स्पष्ट केलं.
23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी वाघा बॉर्डर ओलांडणार होता. या संघाला क्रीडा विभागाकडून सरकारकडून कोणतेही शुल्क न घेता ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालं होतं. मात्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून (MEA) मंजुरी मिळू शकली नाही.
"आम्हाला सांगण्यात आले आहे की अंध संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. आम्ही उद्या वाघा बॉर्डरवर जाणार होतो. परंतु अद्याप मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही थोडे निराश झालो आहोत," असे क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाचे (CABI) सरचिटणीस शैलेंद्र यादव यांनी पीटीआयला सांगितलं.
शैंलेंद्र यादव म्हणाले की, जर आम्हाला याबद्दल लवकर सांगण्यात आलं असतं तर संघ निवडण्यापासून ते प्रशिक्षणापर्यंत अनेक कष्ट वाचले असते. ते म्हणत आहेत की जेव्हा मेनस्ट्रीम क्रिकेट संघ सुरक्षित नाही तेव्हा तुम्ही तिथे सुरक्षित कसे राहू शकता. अर्थात, आम्ही निर्णय स्वीकारू. पण शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय का रोखून ठेवला, आम्हाला एक महिना किंवा 25 दिवस आधी का कळवले नाही. ही एक प्रक्रिया आहे”.