बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला असला तरी ही मॅच अत्यंत रोमहर्षक झाली. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं १४९ रनची तर दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रनची खेळी केली. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतरही भारताच्या इतर बॅट्समननी निराशा केल्यामुळे या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये एकटा विराट कोहली संघर्ष करताना दिसला. पण माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी विराट कोहलीवर टीका केली आहे.


मायकल होल्डिंगचा विराटवर निशाणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी या मॅचमध्ये निवडण्यात आलेल्या भारतीय टीमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चेतेश्वर पुजारा हा शानदार बॅट्समन आहे. जर कोहली फॉर्ममध्ये नसता तर तो टीमबाहेर राहिला असता का? याआधी कित्येकवेळा गांगुली, लक्ष्मण, द्रविड फॉर्ममध्ये नसायचे तेव्हा त्यांना टीमबाहेर केलं जायचं का? शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणेही फॉर्ममध्ये नाहीत मग पुजारालाच का काढण्यात आलं, असे तिखट सवाल होल्डिंग यांनी विचारले आहेत.


नासीर हुसेनची टीका


इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेननंही विराट कोहलीच्या निर्णयांवर टीका केली आहे. या मॅचमध्ये विराट जबरदस्त खेळला. तो भारताला एकहाती विजयाजवळ घेऊन आला. पण या पराभवाची जबाबदारी विराटला स्वीकारावी लागेल. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची अवस्था ८७/७ अशी होती. सॅम कुरेन आणि आदिल रशीद मैदानात होते. पण तेव्हा रवीचंद्रन अश्विन अचानक एक तासासाठी बॉलिंगला आला नाही. यानंतर भारताची मॅचवरची पकड ढिली झाली. अश्विनची डावखुऱ्या बॅट्समनला बॉलिंग करतानाची सरासरी १९ आहे आणि समोर सॅम कुरेन हा २० वर्षांचा डावखुरा बॅट्समन असताना अश्विनला बॉलिंग का देण्यात आली नाही, असं नासीर हुसेन म्हणाला.


गांगुलीनंही टोचले विराटचे कान


भारतीय टीममध्ये वारंवार बदल केले जात आहेत. पण कर्णधारानं खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांना ठराविक संधी दिली पाहिजे, असं सौरव गांगुली म्हणाला आहे. स्विंग बॉलिंगपुढे अपयशी झालो असं कारण देता येणार नाही कारण इंग्लंडमध्ये स्विंग बॉलिंगपुढेच खेळावं लागतं आणि यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली. पुजारा, राहुल आणि रहाणेबद्दलच्या भूमिकेवरही गांगुलीनं प्रश्न उपस्थि केले. या तीन खेळाडूंची जागा वारंवार बदलण्यात आली नाहीतर त्यांना टीममधून डच्चू देण्यात आला. पण या खेळाडूंसोबत बसून विराटनं त्यांना विश्वास दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.