मुंबई : काही दिवसांपूर्वी गरिबी आणि संघर्षामुळे चर्चेत आलेल्या यशस्वी जायसवालनं स्वत:ला सिद्ध केलं आहे. अंडर-१९ आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीला मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब देऊन गौरवण्यात आलं. यशस्वीनं या स्पर्धेच्या ३ मॅचमध्ये २१४ रन केले. आशिया कप खेळल्यानंतर यशस्वी भारतात परतला आहे. यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्यासह अनेक जणांनी त्याचं स्वागत केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं रविवारी अंडर-१९ आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला. ओपनर यशस्वीनं सर्वाधिक ८५ रन केले. आशिया कपमध्ये २०० पेक्षा जास्त रन करणारा यशस्वी एकमेव खेळाडू होता. यशस्वी यावर्षी जुलैमध्ये सगळ्यात पहिले चर्चेत आला जेव्हा सचिन तेंडुलकरनं त्याला घरी बोलवून बॅट गिफ्ट दिली होती. सचिनला यशस्वीबद्दल अर्जुनकडून माहिती मिळाली होती. अर्जुन आणि यशस्वी जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या अंडर-१९ टीममध्ये होते.


क्रिकेटसाठी उत्तर प्रदेशमधून मुंबईला आला यशस्वी


उत्तर प्रदेशच्या यशस्वीची कहाणी संघर्षमय आहे. यशस्वीला क्रिकेटपटू व्हायचं होतं. पण भदोहीमध्ये छोटंसं दुकान असलेल्या यशस्वीच्या वडिलांना त्याला क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यासाठी पैसे नव्हते. १०-११ वर्षांचा यशस्वी मुंबईत काकांकडे आला. पण काकाही परिस्थितीमुळे यशस्वीला प्रशिक्षण देऊ शकत नव्हते. काकांच्या सांगण्यावरून मुस्लिम युनायटेड क्लबनं यशस्वीला त्यांच्या टेंटमध्ये राहण्याची परवानगी दिली. या टेंटमध्ये आणखी काही मुलं होती.


टेंटमध्ये राहून क्रिकेट खेळला, पाणी पुरी विकली


यशस्वी मुस्लिम युनायटेड क्लबच्या टेंटमध्ये राहायला लागला. वडिल यशस्वीला घरातून पैसे पाठवायचे. पण यशस्वीला हे पैसे पुरायचे नाहीत. म्हणून खेळल्यानंतर उरलेल्या वेळेत यशस्वी पाणी पुरी विकायला लागला. काहीवेळा यशस्वीनं फळंही विकली. यातून यशस्वीचा उदरनिर्वाह सुरु झाला.


प्रशिक्षक ज्वाला सिंगनी यशस्वीला बदललं


यशस्वीची क्रिकेट कारकिर्द घडवण्याचं श्रेय प्रशिक्षक ज्वाला सिंग यांना जातं. ज्वाला सिंग यांनी २०१३ साली यशस्वीला आझाद मैदानात नेटमध्ये बॅटिंग करताना बघितलं. तेव्हा यशस्वी ११-१२ वर्षांचा होता. फक्त क्रिकेट खेळण्यासाठी हा मुलगा टेंटमध्ये राहतो, हे ऐकून मी हैराण झालो, अशी प्रतिक्रिया ज्वाला सिंग यांनी दिली. नेटमध्ये खेळताना बघितल्यावर मी यशस्वीला घरी बोलावलं आणि त्याला फुकटात प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.


नकारात्मक बोलायचा यशस्वी


या मुलाला पाठिंब्याची गरज आहे. त्याला पाठिंबा दिला नाही तर त्याची प्रतिभा नष्ट होईल. मुंबईसारख्या शहरात त्याची राहायची आणि खाण्याचीही सोय नव्हती. यशस्वीबद्दल लोकं नकारात्मक बोलायचे. तू इकडे खेळू शकणार नाहीस, असं त्याला सांगायचे. या कारणामुळे यशस्वीही नकारात्मक बोलायला लागला होता. तेव्हा मी यशस्वीला पाठिंबा द्यायचं ठरवलं. तेव्हापासून यशस्वी माझ्याबरोबर आहे. माझ्यासोबतच तो राहतो, असं ज्वाला सिंग यांनी सांगितलं.


१४ व्या वर्षी बनवलं लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड


यशस्वीनं एकाच मॅचमध्ये त्रिशतक आणि १० पेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे. १४ वर्षांचा असताना यशस्वीनं शील्ड क्रिकेट स्पर्धेत एका मॅचमध्ये ३१९ रनची खेळी केली होती. याच मॅचच्या दोन इनिंगमध्ये यशस्वीनं १३ विकेटही घेतल्या होत्या.


यशस्वी रणजीही खेळेल


जाईल्स शिल्डमधल्या या प्रदर्शनानंतर यशस्वीचा मार्ग थोडासा सोपा झाल्याचं ज्वाला सिंग यांना वाटतं. यशस्वीला अंडर-१६ टीममध्ये जागा मिळाली. यानंतर अंडर-१९ टीममध्येही यशस्वीची निवड झाली. लवकरच तो रणजी क्रिकेटही खेळेल, असा विश्वास ज्वाला सिंग यांनी व्यक्त केला.