नवी दिल्ली : २०११ वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे आपलं शतक हुकल्याचं वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या त्या मॅचमध्ये गंभीर ९७ रनवर आऊट झाला होता. जोपर्यंत मी ९७ रनवर पोहोचलो होतो तोपर्यंत मी शतकाचा विचारही केला नव्हता, पण ९७ रनवर असताना धोनीनं तू शतकापासून फक्त ३ रन दूर आहेस. पहिले शतक पूर्ण कर, असं सांगितलं. पण धोनीच्या त्या वक्तव्यामुळे माझ्या डोक्यात शतकाचा विचार आला आणि मी आऊट झालो, असं गंभीर म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कप फायनलमध्ये माझ्या डोक्यात फक्त श्रीलंकेला हरवण्याचे विचार सुरू होते, पण त्यानंतर माझ लक्ष शतकावर गेलं. जर मी शतकाबाबत विचार केला नसता, तर मी नक्कीच शतक करु शकलो असतो. वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरने ९७ रन आणि धोनीने ९१ रनची खेळी केली होती. धोनीला या सामन्यात मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं.


२००७ टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गंभीर सर्वाधिक रन करणारा भारतीय खेळाडू होता. पण २०११ वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नाही, याबाबतही त्याने नाराजी व्यक्त केली. तुम्ही पूर्ण आयुष्य मेहनत करता, फक्त स्वत:चे रन करण्यासाठी नाही. माझं स्वप्न भारताला वर्ल्ड कप जिंकवून द्यायचं होतं. मला यासाठी २ संधी मिळाल्या आणि दोन्ही वेळा मी सर्वाधिक स्कोअर केला, अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.


२०११ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एवढी चांगली कामगिरी केल्यानंतरही मॅन ऑफ द मॅच न मिळाल्याचं दु:ख गंभीरने बोलून दाखवलं. याआधी मागच्या वर्षी गंभीरने धोनीच्या कर्णधार असताना घेतलेल्या निर्णयावर टीका केली होती. २०१२ साली ऑस्ट्रलिया सीरिजमध्ये धोनीने गंभीर, सेहवाग आणि सचिनला एकत्र खेळवता येणार नसल्याचा निर्णय घेतला.


ऑस्ट्रलिया दौऱ्यात धोनीने घेतलेला निर्णय माझ्यासाठी धक्का होता. २०१५ वर्ल्ड कपसाठीची टीम तयार करत असल्यामुळे आम्ही या तिघांना एकत्र खेळवू शकत नाही, असं धोनीने सांगितलं. पण २०१२मध्येच तुम्ही पुढच्या वर्ल्ड कपमध्ये नसणार असं सांगणं मी कधीच आणि कुठेच ऐकलं नव्हतं. जर तुम्ही रन करत असाल तर वय हा फक्त आकडा असतो, असं गंभीर म्हणाला होता.


ऑस्ट्रलियातल्या त्या सीरिजमध्ये सुरुवातीला आम्हाला तिघांना एकत्र खेळवण्यात आलं नाही. पण जेव्हा विजयाची गरज होती तेव्हा मात्र तिघांना संधी दिली. जर तुम्ही एखादा निर्णय घेतला असेल, तर त्यावर कायम राहा. आपल्या निर्णयापासून हटू नका, अशी टीका गंभीरने धोनीवर केली होती.