आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानने तयारी सुरु केली असून मोठे बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) यांची पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. गॅरी कस्टर्न यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2011 चा वर्ल्डकप (World Cup) जिंकला होता. तसंच ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज जेसन गिलेस्पी यांची कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅरी कस्टर्न सध्या आयपीएल संघ गुजरात टायटन्सचा मेंटॉर आहे. गॅरी कस्टर्न भारताशिवाय तीन वर्ष दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत. टी-20 वर्ल्डकपसाठी 1 महिना शिल्लक असतानाच गॅरी कस्टर्न यांची पाकिस्तानने प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. मिकी आर्थर यांच्यानंतर पाकिस्तान संघाचं प्रशिक्षकपद रिक्त होतं. आर्थर यांच्यानंर मोहम्मद हफीज यांनी संघ संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील खराब प्रदर्शनानंतर त्यांनी हटवण्यात आलं. 


गॅरी कस्टर्न यांनी दक्षिण आफ्रिकेकडून 101 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 15.27 च्या सरासरीने 7289 धावा केल्या आहेत. यादरम्यान 275 ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या होती. आपल्या कसोटी करिअरमध्ये गॅरी यांनी 21 शतक आणि 34 अर्धशतकं लगावली. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांची कामगिरी चांगली होती. त्यांनी 185 एकदिवसीय सामन्यात 6798 धावा केल्या होत्या. यामध्ये 13 शतकं आणि 45 अर्धशतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 185 वर नाबाद ही त्यांची सर्वोच्च धावसंख्य आहेत. 1999 च्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती. 



दुरीसकडे गिलेस्पी यांनी ऑस्ट्रेलियाकडून 71 कसोटी, 97 एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. कसोटीमध्ये गिलेस्पी यांनी 26.19 च्या सरासरीने 259 विकेट्स घेतल्या आहेत. 8 वेळा त्यांनी 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली. फलंदाजीबद्दल बोलायचं गेल्यास गिलेस्पी यांनी कसोटीत 18.73 च्या सरासरीने 1218 धावा केल्या होत्या. 


गिलेस्पी यांच्या नावे एकदिवीय क्रिकेटमध्ये 142 विकेट्स आहेत. तीन वेळा त्यांनी 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.  याशिवाय गिलेस्पी यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विकेट घेतला आहे. आयपीएलमध्ये ते पंजाबचे गोलंदाज प्रशिक्षक राहिले आहेत.