भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी कर्स्टन, रमण, व्यंकटेश प्रसाद यांच्या नावाची शिफारस
भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी समितीनं तीन खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे.
मुंबई : भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी समितीनं तीन खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे. यामध्ये गॅरी कर्स्टन, डब्ल्यूव्ही रमण आणि वेंकटेश प्रसाद या तिघांच्या नावाचा समावेश आहे. गुरुवारी बीसीसीआयच्या समितीनं मुंबईमध्ये १० इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर तिघांची नावं निश्चित करण्यात आली. भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ३० नोव्हेंबरपासून हे पद खाली आहे. भारतीय महिला टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी रमेश पोवार यांनी पुन्हा एकदा अर्ज केला होता. पण भारतीय महिला टीमची सदस्य मिताली राजसोबत झालेल्या वादाचा फटका त्यांना बसल्याचं बोललं जातंय.
रमेश पोवार यांच्याबरोबरच मनोज प्रभाकर, डब्ल्यूव्ही रमण यांची मुंबईमध्ये मुलाखत घेण्यात आली. पण या तिघांची निवड करण्यात आली नाही. तर गॅरी कर्स्टन यांची स्काईपवरून आणि भारताच्या माजी क्रिकेटपटू कल्पना वेंकटाचार यांची मुलाखत फोनवरून घेण्यात आली.
कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांच्या समितीनं या सगळ्या मुलाखती घेतल्या आणि कर्स्टन, रमण आणि व्यंकटेश प्रसाद यांच्या नावाची शिफारस केली. याबद्दलचा पुढचा निर्णय आता बीसीसीआयकडून घेण्यात येईल. या मुलाखती फक्त मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठी होती, सहाय्यक प्रशिक्षकासाठी नव्हती, असं अंशुमन गायकवाड यांनी सांगितल्याची बातमी ईएसपीएन क्रिकईन्फो या वेबसाईटनं दिली आहे. भारतीय महिला टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी २८ जणांनी अर्ज केले होते.
प्रशिक्षक निवडीवरून विनोद राय-डायना एडुल्जींमध्येही वाद
भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांची कारकिर्द ३० नोव्हेंबरला संपली होती. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपवेळी रमेश पोवार आणि भारतीय टीमची सदस्य मिताली राज यांच्यात वाद झाले होते. इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये मिताली राजला वगळण्यात आलं. या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. टीममधून वगळल्यामुळे मितालीनं रमेश पोवार यांच्यावर आरोप केले होते.
रमेश पोवार आणि डायना एडुल्जी यांनी माझी कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी माझ्याबरोबर भेदभाव केला, असा आरोप मिताली राजनं केला. मितालीच्या या आरोपांना रमेश पोवारनंही प्रत्युत्तर दिलं. मितालीनं वर्ल्ड कपदरम्यान ओपनिंगला खेळवलं नाही तर निवृत्ती घेईन, अशी धमकी दिली होती, असा आरोप रमेश पोवार यांनी केला होता.