Video: भारताला २ वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरची निवृत्ती
२ वर्षांपासून भारतीय टीममधून बाहेर असलेल्या गौतम गंभीरनं क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : २ वर्षांपासून भारतीय टीममधून बाहेर असलेल्या गौतम गंभीरनं क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीरनं मंगळवारी त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. गौतम गंभीरनं त्याच्या फेसबूक पेजवरून आपण क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं सांगितलं.
गौतम गंभीर काहीच दिवसांपूर्वी ३७ वर्षांचा झाला होता. भारतीय टीममध्ये निवड होत नसल्यामुळे त्याच्या क्रिकेटमधल्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर गंभीरनं निवृत्तीचा निर्णय घेतला. गौतम गंभीरनं ५८ टेस्ट, १४७ वनडे आणि ३७ टी-२० मॅच खेळल्या. गौतम गंभीर टीममध्ये असताना भारतानं २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला. या दोन्ही वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीर भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.
निवृत्तीचा निर्णय हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय होता. अनेक दिवसांपासून ती वेळ आता आली आहे असं मला वाटत होतं. क्रिकेट कारकिर्दीमध्ये मला मदत करणाऱ्या सगळ्यांचे धन्यवाद, असं गंभीर म्हणाला आहे.
२०११ सालच्या श्रीलंकेविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये गौतम गंभीरनं १२२ बॉलमध्ये ९७ रन केले. तर २००७ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरनं ५४ बॉलमध्ये ७५ रनची तडाखेबाज खेळी केली होती. या दोन्ही वर्ल्ड कप फायनलच्या विजयाचा शिल्पकार गौतम गंभीर होता. या दोन्ही मॅचमध्ये गंभीर भारताचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता.