दिल्ली : टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या दोघांनीही जवळपास एक दशक टीम इंडियासाठी क्रिकेट खेळलं आहे. यावेळी या दोघांमधील धुसफूस अनेकदा समोरही आली. इतकंच नाही तर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गंभीरने धोनीवर खुलेपणाने टीकाही केली होती. यानंतर आता पुन्हा गंभीरने धोनीवर भाष्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जतिन सप्रूसोबत गौतम गंभीर त्याच्या यूट्यूब चॅनेलशी बोलत होता. यावेळी त्याने धोनीचं प्रचंड कौतुक केलं आहे. शिवाय या मुलाखतीत त्याने धोनी आवडत नसल्याची अफवा असल्याचं सांगितलं आहे.


गौतम गंभीर म्हणाला, एमएस धोनीबाबत माझ्या मनात खूप सन्मान आहे. मी ही गोष्ट ऑन एअर बोललो आहे. आणि 138 कोटी लोकांसमोरही मी हे सांगू शकतो. 


एक कर्णधार म्हणून आणि माणूस म्हणून धोनीने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केलं आहे, त्यामुळे कधीही गरज पडली तर मी त्याच्या पाठीशी उभा राहणारा पहिला व्यक्ती असेन, असंही गंभीर म्हणालाय.


2003 साली गौतम गंभीरने टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने 2004 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाची जर्सी घातली होती. 2007 साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गंभीरने 75 रन्स करत मोलाची भूमिका बजावली होती.


गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार, ''धोनी टेस्ट क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार बनण्यामागील कारण म्हणजे झहीर खान. झहीर खान धोनीला मिळणं हे त्याचं भाग्य होतं. माझ्या मते, झहीर हा भारताचा सर्वोत्तम जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज आहे."