मुंबई : गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यामधील नातं क्रिकेट विश्वात सगळ्यांनाच माहिती आहे. आता या दोन्ही खेळाडूंमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. मला गौतम गंभीर आणि शेन वॉर्नविरुद्ध खेळायला मजा यायची, कारण ते स्लेजिंगला प्रत्युत्तर द्यायचे, असं आफ्रिदी म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गौतम गंभीरच्या वागण्याच्या पद्धतीत अडचण होती. गौतम गंभीर काही व्यक्तीमत्व नव्हतं. क्रिकेटमध्ये गंभीर ठिकठाकच होता. गंभीरचे रेकॉर्डही महान नाहीत. त्याला फारच माज आहे. गंभीर स्वत:ला डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉन्ड समजतो,' अशी टीका शाहिद आफ्रिदीने केली होती.


शाहिद आफ्रिदीच्या या टीकेला गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिलं आहे. 'ज्याला स्वत:चं वय लक्षात राहत नाही, त्याला माझी रेकॉर्ड काय लक्षात राहणार? शाहिद आफ्रिदीच्या माहितीसाठी २००७ टी-२० वर्ल्ड कप फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान गंभीर ५४ बॉलमध्ये ७५ रन, शाहिद आफ्रिदी १ बॉलमध्ये शून्य रन. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही वर्ल्ड कप जिंकलो. आणि हो मी खोटारड्या आणि संधीसाधू माणसांना माज दाखवतो,' असा सणसणीत टोला गौतम गंभीरने हाणला आहे.



याआधी शाहिद आफ्रिदीने त्याचं आत्मचरित्र 'द गेम चेंजर'मध्येही गौतम गंभीरवर टीका केली होती. फक्त मैदानाबाहेरच नाही तर मैदानामध्येही या दोन्ही खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाले होते. 


२००७ साली पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात गंभीर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. आफ्रिदीच्या बॉलिंगवर एक रन काढताना दोघांमध्ये टक्कर झाली. आफ्रिदीने मुद्दाम टक्कर मारल्याचं वाटल्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाले. गंभीर आणि आफ्रिदी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एवढच नाही तर दोघांनी एकमेकांना शिव्याही दिल्या. अखेर मैदानातल्या अंपायरना या दोघांना बाजूला करावं लागलं.