टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडचा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत बीसीसीआय सध्या नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यासाठी अनेक नावं पुढे आली असून, यामध्ये माजी भारतीय क्रिकेट गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. गौतम गंभीरने कोलकाता संघाच्या मेंटॉरपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच वर्षी विजेतेपद मिळवून देत यशस्वी कमबॅक केलं आहे. यानंतर गौतम गंभीरच्या नावाला पसंती मिळत असून, त्याची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. दरम्यान यावर गौतम गंभीर व्यक्त झाला असून राष्ट्रीय संघाचं प्रशिक्षकपद यापेक्षा मोठा मान नाही असं म्हटलं आहे. तुम्ही भारतीय संघाला प्रशिक्षण देताना 140 कोटी लोकांच्या प्रार्थनाही विजयात मोलाचा वाटा उचलतात अशी भावनाही त्याने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मला भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यास आवडेल. आपल्या राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देणं यापेक्षा मोठा मान नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करत असता," असं गौतम गंभीर म्हणाला आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने गौतम गंभीरला भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी पाठिंबा दिला होता. तो एक चांगला उमेदवार असल्याचं गांगुलीने सांगितलं होतं. दरम्यान गौतम गंभीर अबुधाबी मेडॉर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होता.



यावेळी एका विद्यार्थ्याने त्याला भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद स्विकारण्याबद्दल आणि त्याच्या अनुभवाचा फायदा देत विश्वचषक जिंकण्यात मदत करण्याबद्दल विचारलं असता गंभीरने "मला बरेच लोक विचारत असताना अद्याप या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही. परंतु मला आता तुम्हाला उत्तर द्यावे लागेल' असं म्हटलं. 


"140 कोटी भारतीय आहेत भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करतील. जर सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली तर भारत विश्वचषक जिंकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्भय असायला हवं," असं गौतम गंभीर म्हणाला आहे. 


गौतम गंभीर 2007 टी-20 विश्वकप आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. दरम्यान कोलकाता संघाच्या यशानंतर पुन्हा एकदा गंभीरचं कौतुक होत. "एक आनंदी ड्रेसिंग रुम सुरक्षित ड्रेसिंग रुम असते. आणि एक आनंदी ड्रेसिंग रुम विजयी ड्रेसिंग रुम ठरते. केकेआरमध्ये मी फक्त या मंत्राचे पालन केले. देवाच्या कृपेने ते प्रत्यक्षात उतरलं," असं तो म्हणाला.