Gautam Gambhir on KL Rahul: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात के एल राहुल (KL Rahul) सपशेल अपयशी ठरल्याने त्याच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. तर दुसरीकडे त्याच्या तुलनेत नवख्या सरफराजने 150 धावांची तुफानी खेळी केली. यामुळेच दुसऱ्या कसोटी सामन्यात के एल राहुलच्या जागी सरफराजला संधी मिळणार का? याची चर्चा रंगली होती. पण भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) के एल राहुलला पाठिंबा दिला असून संघ व्यवस्थापनाचं मत महत्वाचं असून, सोशल मीडियावरील (Social Media) टीकेचा आपण फार विचार करत नसल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यातील पहिल्या डावात के एल राहुल शून्य आणि दुसऱ्या डावात 12 धावांवर बाद झाला. हा सामना न्यूझीलंडने 8 गडी राखून जिंकला. के एल राहुलच्या खराब कामगिरीनंतरही गौतम गंभीर मात्र त्याला अद्याप त्याला संधी देण्यास तयार आहे. 


"सोशल मीडियामुळे मला थोडाही फरक पडत नाही. संघ व्यवस्थापन आणि नेतृत्व काय विचार करतं हे महत्त्वाचं आहे. तो चांगली फलंदाजी करत आहे. कानपूरमध्ये फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी नसतानाही त्याने चांगली कामगिरी केली," असं गौतम गंभीरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. गौतम गंभीरला प्रसारमाध्यमांनी राहुलच्या संघातील जागेबाबत विचारलं होतं. 


राहुलने कानपूरमध्ये बांगलादेशविरोधातील कसोटी सामन्यात 68 धावा केल्या होत्या. "आपल्याला जास्त धावा करायच्या आहेत याची त्यालाही जाणीव आहे. त्याच्यामध्ये धावा करण्याच्या क्षमता आहेत. त्यामुळेच त्याला संघाचा पाठिंबा मिळत आहे. खरं तर प्रत्येकाबद्दल मत तयार केलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकाला याचा सामना करावा लागतो," असं गौतम गंभीर म्हणाला. 


पहिल्या कसोटीतील सरफराज खानच्या शतकामुळे राहुलसाठी पुढची वाटचाल खडतर झाली होती. कर्नाटकचा हा खेळाडू दुसऱ्या सामन्यात आपली निवड योग्य ठरवण्याच्या प्रयत्नात असेल. बंगळुरूमध्ये आठ विकेट्सने विजय मिळवून न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे.


लखनऊ के एल राहुलला रिलीज करणार


टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, लखनऊ संघाचा मेंटॉर झहीर खान आणि प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी मागील आयपीएलमध्ये संघाच्या कामगिरीत आणि पराभवात के एल राहुलची नेमकी काय भूमिका होती याचा आढावा घेतला. आकडेवारी पाहण्यात आली असता के एल राहुलने जितके चेंडू खेळले आहेत, ते पाहता संघाच्या पराभवाची शक्यता जास्त असल्याचं दिसून आलं. 


"एलएसजी व्यवस्थापन ज्यामध्ये मेंटॉर झहीर खान आणि प्रशिक्षक जस्टीम लँगर यांचा समावेश आहे त्यांनी संपूर्ण आकडेवारी तपासली. यावेळी लक्षात आलं की, जेव्हा जेव्हा के एल राहुलने जास्त चेंडू खेळले आणि धावा केल्या तेव्हा तेव्हा संघाचा पराभव झाला. म्हणजेच के एल राहुलची फलंदाजी सामन्याला साजेशी नव्हती. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे आता धावसंख्या जास्त होण्याची शक्यता वाढली आहे. अशात वरच्या फळीतील फलंदाज जास्त चेंडू आणि वेळ घेत असेल तर ते संघाला परवडणारं नाही," असं आयपीएलमधील सूत्राने सांगितलं आहे.