कोलकाता : भारत आणि वेस्ट इंडिजमधली पहिली टी-२० मॅच कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात खेळवण्यात आली. या मॅचची सुरुवात भारतीय टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीननं बेल वाजवून केली. पण भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरला ही गोष्ट पटली नाही. या प्रकारानंतर गंभीरनं बीसीसीआय, सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेली प्रशासकीय समिती आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालवर निशाणा साधला आहे. मॅच फिक्सिंगमुळे कर्णधारपद आणि भारतीय टीममधलं स्थान गमवावं लागलेल्या अजहरनं बेल वाजवल्यावर गंभीरनं आक्षेप घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं पहिली टी-२० जरी जिंकली असली तरी माफ करा बीसीसीआय, प्रशासकीय समिती आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा पराभव झाला. भ्रष्टाचाऱ्याच्या विरोधातली निती रविवारी सुट्टीवर गेली होती, असं वाटतंय. एचसीए (हैदराबाद क्रिकेट असोसिएशन)ची निवडणूक लढवण्याची परवानगी त्यांना मिळाली आहे पण हे धक्कादायक आहे. बेल वाजत आहे, तुम्हाला ती ऐकायला येईल, अशी अपेक्षा आहे, असं ट्विट गंभीरनं केलं आहे.



गंभीरच्या या ट्विटनंतर त्याला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. तसंच न्यायालयानं अजहरुद्दीनला क्लिन चीट दिली असल्याची आठवणही काहींनी गंभीरला करून दिली. पण या सगळ्या मुद्द्यावर बीसीसीआय, प्रशासकीय समिती आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इतर खेळाडूंनीही या प्रकरणावर मौन बाळगलं आहे.


मॅच फिक्सिंग प्रकरणात अजहरुद्दीनचं नाव २००० साली आलं होतं. यानंतर त्याच्यावर जन्मभर क्रिकेट खेळण्याची बंदी घालण्यात आली. यामुळे अजहरची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली. यानंतर २००९ साली अजहर काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकला. मागच्या वर्षी एचसीएच्या अध्यक्षपदासाठीही अजहरनं नामांकन दिलं होतं. पण त्याला अध्यक्ष बनता आलं नाही.