बॉल छेडछाड प्रकरणी स्मिथ-वॉर्नरचं निलंबन, गंभीरला वेगळाच संशय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. तर कॅमरून बँक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्या वादावर क्रिकेटपटू गौतम गंभीरनं वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
म्हणून झाली स्मिथ-वॉर्नरवर कारवाई?
मी कदाचित भावनिक होत असेन पण स्मिथ मला चिटर वाटत नाही. स्मिथ मला देशाला आणि स्वत:च्या टीमला जिंकवण्यासाठी काहीही करणारा कर्णधार वाटतो. त्याची ही पद्धत आक्षेपार्ह आहे पण त्याला भ्रष्टाचाराचा शिक्का लावू नका.
क्रिकेट भ्रष्टाचार मुक्त असलं पाहिजे पण स्मिथ आणि वॉर्नरवर करण्यात आलेली कारवाई जास्तच कठोर आहे. खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याबाबत या दोघांनी केलेल्या बंडाची शिक्षा त्यांना मिळाली आहे का? असा सवाल गंभीरनं उपस्थित केला आहे. खेळाडूंसाठी उभं राहणाऱ्यांचं व्यवस्थापन काय करतं याचा इतिहास आहे. इयन चॅपल हे याचं उत्तम उदाहरण आहे, असं ट्विट गंभीरनं केलं आहे.
खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाविषयी मला वाईट वाटत आहे. ऑस्ट्रेलियाचे नागरिक आणि मीडिया त्यांना लक्ष्य करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. बंदीपेक्षा कोणीही चिटर म्हणणं मोठी शिक्षा असल्याचं गंभीर म्हणाला आहे.