मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीवर निशाणा साधला आहे. भारत सरकारने काश्मीरला विशेषाधिकार देणारं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केला. यानंतर पाकिस्तान चांगलंच खवळलं. मी काश्मीरच्या जनतेसोबत आहे, यासाठी नियंत्रण रेषेचा (एलओसी) दौरा करणार असल्याची घोषणा आफ्रिदीने केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिदीच्या या भूमिकेवर टीका करणारं ट्विट गौतम गंभीरने केलं आहे. 'या फोटोमध्ये शाहिद आफ्रिदी शाहिद आफ्रिदीला विचारतोय, शाहिद आफ्रिदीला लाज वाटण्यासाठी काय केलं पाहिजे. शाहिद आफ्रिदीने मोठं व्हायला नकार दिला आहे. त्याच्या मदतीसाठी मी ऑनलाईन किंडरगार्डन ऑर्डर करत आहे,' असं ट्विट गंभीरने केलं.



आफ्रिदी बुधवारी ट्विट करून म्हणाला होता, 'पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मिरींच्या समर्थनासाठी सुरु केलेल्या कार्यक्रमाला समर्थन द्या. मी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मजार-ए-काएद (मोहम्मद अली जिनांची मजार)ला भेट देणार आहे. काश्मिरी बंधूंच्या समर्थनासाठी माझ्यासोबत या. ६ सप्टेंबरला मी शहिदांच्या घरी जाईन आणि लवकरच एलओसीवरही जाईन.'


शाहिद आफ्रिदीच्याआधी पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश बॉक्सर आमिर खानने मंगळवारी एलओसीचा दौरा केला होता. एलओसीच्या ३ किमी अंतरावर असलेल्या चखोटी या ठिकाणी आमिर खान गेला होता. पाकिस्तानी लष्कराने आमिर खानच्या या दौऱ्याचं आयोजन केलं होतं.


शाहिद आफ्रिदीबरोबरच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादही काश्मीर प्रश्नावरून एलओसीचा दौरा करणार आहे. अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द झाल्यानंतरही शाहिद आफ्रिदीने या मुद्द्यात नाक खुपसलं होतं.


'संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार काश्मिरींना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेलं आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे,' असं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं. आफ्रिदीने त्याच्या ट्विटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही टॅग केलं.