नवी दिल्ली : दिल्लीचा फास्ट बॉलर नवदीप सैनीची अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये निवड करण्यात आली आहे. मोहम्मद शमी यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे सैनीला संधी देण्यात आली. नवदीप सैनीच्या निवडीनंतर गौतम गंभीरनं भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली डिसट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन(डीडीसीए)चे सदस्य बिशनसिंग बेदी आणि चेतन चौहान यांच्यावर टीका केली आहे. बेदी आणि चौहान यांनी नवदीप सैनीच्या दिल्ली रणजी टीममध्ये झालेल्या निवडीला विरोध केला होता. पण आता भारतीय टीममध्ये निवड झाल्यावर गंभीरनं ट्विटरवरून बेदी आणि चौहान यांचा समाचार घेतला.


काय म्हणाला गौतम गंभीर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीडीसीएच्या काही सदस्यांप्रती माझी शोक संवेदना आहे. 'बाहेरच्या' नवदीप सैनीची भारतीय टीममध्ये निवड झाल्यामुळे ही संवेदना आहे. नवदीप सैनी हा कोणत्याही राज्याचा असण्याआधी एक भारतीय आहे, असं गंभीर म्हणाला आहे.



काय होता सैनीचा वाद?


पाच वर्षांपूर्वी बिशनसिंग बेदींनी तत्कालिन डीडीसीए अध्यक्ष अरुण जेटलींना पत्र लिहून नवदीप सैनीच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी नवदीप सैनीला दिल्लीच्या रणजी टीममध्ये विदर्भाविरुद्धच्या मॅचसाठी निवडण्यात आलं होतं. नवदीप सैनी मागच्या वर्षी दिल्लीमध्ये क्रिकेट खेळलेला नाही. रणजी टीममध्ये सैनीची निवड झाली तर ती बाहेरच्या खेळाडूची निवड असेल. अनेक प्रतिभावान खेळाडू त्यांच्या संधींची वाट पाहत आहेत. तुम्ही सैनीला संधी दिलीत तर तो अन्याय असेल, असं पत्र पाच वर्षांपूर्वी बेदींनी अरुण जेटलींना पाठवलं होतं. 


कोण आहे नवदीप सैनी?


रणजीमध्ये दिल्लीकडून खेळणारा नवदीप सैनी घरगुती क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात जलद बॉलरपैकी एक आहे. मागच्या दोन रणजी मोसमामध्ये सैनीनं चांगलं प्रदर्शन केलं आहे. सैनी भारतीय अ टीमच्या चार दिवसांच्या मॅचसाठी पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यालाही जाणार आहे. २५ वर्षांचा नवदीप सैनीनं आत्तापर्यंत ३१ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ९६ विकेट घेतल्या आहेत.