नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आधीच खराब कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीच्या टीमचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. गंभीरच्याऐवजी आता श्रेयस अय्यरकडे टीमचं नेतृत्व असणार आहे. याआधी गंभीर कोलकात्याच्या टीमचा कर्णधार होता. पण लिलावाआधी गंभीरनं आपल्याला कोलकात्याकडून खेळायचं नसून दिल्लीकडून खेळायचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच मला रिटेन करु नका किंवा लिलावातही विकत घेऊ नका, अशी विनंतीही गंभीरनं कोलकात्याच्या मालकांना केली होती. यानंतर झालेल्या लिलावामध्ये दिल्लीनं गंभीरला विकत घेतलं आणि त्याला कर्णधार बनवलं. गंभीरच्या नेतृत्वात खेळताना कोलकाता दोन वेळा आयपीएल जिंकली होती.


गंभीर घेणार नाही पैसे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल लिलावामध्ये दिल्लीनं गंभीरला २ कोटी ८० लाख रुपये देऊन विकत घेतलं. पण दिल्लीच्या निराशाजनक कामगिरीमुळे यातला एकही पैसा न घेण्याचा निर्णय गंभीरनं घेतला आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीचा ६ पैकी ५ मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मॅचमध्ये गंभीरनं फक्त ८५ रन केल्या आहेत.


भविष्याबाबत विचार करुन निर्णय


क्रिकेटमधल्या भविष्याबाबत विचार करून निर्णय घेईन, अशी प्रतिक्रिया गौतम गंभीरनं दिली आहे. माझा खेळ कोणत्या दिशेनं पुढे जातोय हे मला पाहावं लागेल, असं गंभीर म्हणालाय. मी कर्णधारपदाचा दबाव झेलू शकलो नाही म्हणून राजीनामा देत आहे. हा निर्णय सर्वस्वी माझा आहे. तसंच फ्रेंचायजीकडून माझ्यावर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. हा निर्णय घेण्याआधी मी माझ्या पत्नीशी बोललो होतो, असा खुलासा गौतम गंभीरनं केला आहे.