Tokyo Olympics: मैदानात कोचकडून घोड्याशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल होताच मिळाली शिक्षा
टोकियो ऑलिम्पिक सुरू आहेत. याच दरम्यान घोडेस्वारीच्या स्पर्धा सुरू असताना एक लाजीरवाणा प्रकार घडला.
टोकियो: टोकियो ऑलिम्पिक सुरू आहेत. याच दरम्यान घोडेस्वारीच्या स्पर्धा सुरू असताना एक लाजीरवाणा प्रकार घडला. कोचने घोड्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या कोचवर कारवाई करण्यात आली आहेत. कोचला घोड्याशी गैरवर्तन करणं चांगलंच महागात पडलं आहे.
ऑलिम्पिकमधील वुमेन्स मॉडर्न पेन्टाथलॉन स्पर्धेदरम्यान, एका जर्मन कोचला घोड्याला मारणे खूप महागात पडलं आहे. या घटनेनंतर किम रायस्नर प्राणीप्रेमींच्या निशाण्यावर आल्या. तर व्हिडीओ व्हायरल होताच त्यांचावर तातडीनं कारवाई करण्यात आली.
जर्मनीची खेळाडू अन्निका श्लेऊचे कोच किम रायस्नरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर किम यांना टोकियो ऑलिम्पिकमधून निलंबित करण्यात आलं आहे. 8 ऑगस्ट रोजी त्याचे निलंबन लागू होईल.व्हिडीओमध्ये कोच किम रायस्नरने 'सेंट बॉय' नावाच्या घोड्याशी गैरवर्तन केलं. त्याला हाताने मारण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर घोडा जम्पिंग स्पर्धेसाठी पुढे न जाता मागे सरकला. त्याने जम्पिंगचा राऊंड पूर्ण केला नाहीय त्यामुळ जर्मनीच्या खेळाडूचं सुवर्णपदक हुकलं.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच संताप व्यक्त केला जात आहे. एकतर अशा पद्धतीनं घोड्याशी गैरवर्तन करणं आणि दुसरं म्हणजे स्पर्धा सुरू असताना अशा प्रकारे ढवळाढवळ करणं कितपत योग्य आहे असाही प्रश्न विचारला जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर व्हायरल होताच कोचवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.