पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यापेक्षा जिंकून अंक मिळवा, गावसकर यांचा सल्ला
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक जण या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत आहे.
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक जण या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत आहे. या हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यामुळे भारतीयांमध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी भावना भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली. यामध्ये सौरव गांगुली, अजहरुद्दीन आणि हरभजन सिंग यांचा समावेश आहे. पण भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचं मत मात्र वेगळं आहे. याबद्दल सुनील गावसकर यांनी इंडिया टुडेला प्रतिक्रिया दिली.
'भारतीय टीम जर वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसेल तर कोण जिंकणार? आणि मी फक्त सेमीफायनल आणि फायनल मॅच बद्दल नाही बोलत आहे. कोण जिंकणार? पाकिस्तानच जिंकणार कारण त्यांना काहीही न करता फुकटात २ गूण मिळतील.' असे गावसकर म्हणाले.
'भारताने आतापर्यंत प्रत्येकवेळी वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे. पण जर पाकिस्तानविरुद्ध होणारी मॅच आपण खेळलो नाही तर आपलाच २ गुणांचा तोटा होईल. यापेक्षा मॅच खेळून त्यांचा पराभव केला तर त्यांचे वर्ल्ड कप मधील आव्हान संपुष्टात आणण्यास मदत होईल', असं गावसकर यांना वाटतं.
मी देशासोबत आहे
'मी देशासोबत आहे. सरकार याबदद्ल जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. जर सरकारने निर्णय घेतला की, पाकिस्तानविरुद्ध खेळायचे नाही, तर तो निर्णय मला मान्य आहे, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं. भारत-पाकिस्तान टीममध्ये २०१२ पासून द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. या दोन्ही टीममध्ये अखेरची पूर्ण सीरिज २००७ साली झाली होती.
तर आपले नुकसान होणार
'भारत पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही, तर त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. उलट त्यांचा फायदाच होईल. या सर्व प्रकरणात सखोल विचार करायला हवा, असे गावसकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'आपण जेव्हा पाकिस्तान सोबत खेळणार नाही, तेव्हा यातून काय सिद्ध होईल? मला आपल्या टीमवर विश्वास आहे. पाकिस्तानसोबत मॅच न खेळल्याने २ गुणांचे नुकसान होईल, पण तरीसुद्धा आपली टीम वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.'
'मी इम्रानसोबत बोलतो'
दोन्ही देशात ताणलेले संबंध सुधारवण्यासाठी इम्राननं एक पाऊल टाकायला हवे, असे मी त्याला आव्हान करेन. मला त्याच्या सोबत थेट बोलु द्या. मी त्याची खूप प्रशंसा करतो, तो माझा मित्र आहे. मी त्याला सांगेन की, जेव्हा तू पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता, तेव्हा तू म्हणाला होतास की, हा नवा पाकिस्तान असेल'.
'आम्ही मित्र आहोत'
पाकिस्तानचे अनेक खेळाडू आमचे चांगले मित्र आहेत. आमच्यात जसे संबंध आहेत, त्याच प्रकारचे संबंध दोन्ही देशातील नागरिकांचे व्हावे, अशी माझी इच्छा आहे. इम्रान माझा मित्र आहे. वसीम अकरम, रमीज राजा, शोएब अख्तर हे देखील माझे मित्र आहेत. जेव्हा आम्ही भारतात किंवा इतर ठिकाणी भेटतो तेव्हा आम्ही एकत्र सोबत वेळ घालवतो. आमच्यात ज्या प्रकारचे संबंध आहेत, त्याच प्रकारचे संबंध दोन्ही देशातील नागरिकांचे असावेत आणि त्यांनी देखील आमच्या सारखाच वेळ घालवावा, असे मला वाटते, असं गावसकर म्हणाले.