B`Day Special: दारुच्या नशेत गिब्जने ठोकले होते शतक
दक्षिण आफ्रिकेचा वादग्रस्त क्रिकेटर हर्शेल गिब्ज आज आपला ४५वा वाढदिवस साजरा करतोय. आफ्रिकेच्या या विस्फोटक ओपनरची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी राहिलीये.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा वादग्रस्त क्रिकेटर हर्शेल गिब्ज आज आपला ४५वा वाढदिवस साजरा करतोय. आफ्रिकेच्या या विस्फोटक ओपनरची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी राहिलीये.
गिब्ज खरतंर चांगल्या फिल्डिंगसाठी ओळखला जातो. तो रग्बीही चांगला खेळतो त्यामुळे त्याची फिल्डिंग चांगली होती. जाँटी ऱ्होडसने फिल्डिंगमध्ये आपली एक नवी ओळख निर्माण केली होती आणि आजही इतिहासात तो सर्वोत्कृष्ट फिल्डर म्हणून ओळखला जातो. त्यानंतर हर्शेल गिब्जने त्याचे स्थान सांभाळले.
२०००मध्ये गिब्जचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले होते. ज्यानंतर सहा महिन्यांसाठी त्याला सस्पेंड करण्यात आले. यासोबतच त्याला दंडही ठोठावण्यात आला होता.
नुकताच हर्शेल गिब्जने ‘टू द पॉइंट: द नो हॉल्ड बार्ड ऑटोबायोग्राफी’ या आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये एक खुलासा केलाय. यात त्याने हँगओव्हर असतानाही मैदानात उतरत कशा प्रकारे शतक ठोकले होते याचा खुलासा केलाय.
क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड द. आफ्रिकेच्या नावावर आहे. ११ वर्षांपूर्वी २००६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३४ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने ४३८ धावा केल्या होत्या. या सामन्यात हर्शेल गिब्जने १७५ धावांची खेळी केली होती.
या खेळीबाबत गिब्जने नुकताच खुलासा केलाय. गिब्ज म्हणाला, या सामन्यादरम्यान तो नशेत होता आणि नशेतच त्याने ही खेळी साकारली होती.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर माईक हसीनेही याबाबत आपल्या पुस्तकात खुलासा केलाय. गिब्ज सामन्याआधी जेव्हा सकाळी नाश्ता करण्यासाठी तेव्हा तो नशेत होता. तो अर्धी रात्र दारुच पीत होता.