मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या ए टीमविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन मॅचसाठी भारतीय ए टीमची बीसीसीआयनं घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या टीमचा कर्णधार असेल. याआधी आयपीएलदरम्यान गौतम गंभीरनं तडकाफडकी कर्णधारपद सोडल्यामुळे श्रेयस अय्यरकडे दिल्लीचं कर्णधारपद देण्यात आलं. आयपीएलदरम्यानचाच एक अनुभव श्रेयस अय्यरनं एका मुलाखतीमध्ये सांगितला. आयपीएल लिलावाची बातमी आल्यानंतर एक मैत्रीण मला वारंवार मेसेज करायला लागली. माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू लागली. याबद्दल मी त्या मुलीला विचारलं तेव्हा तिनं तुझ्यासाठी मी आनंदी आहे असं उत्तर दिलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती माझ्या नाही तर पैशांच्या मागे आहे, असं श्रेयस अय्यर म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाग्रता ठेवण्यासाठी मीडियापासून लांब राहा. वृत्तपत्र वाचू नकोस, सोशल मीडियापासूनही दूर राहा, असा सल्ला मला धोनीनं दिल्याचं वक्तव्य श्रेयस अय्यर यानं केलं. सोशल मीडिया आता सगळ्यांच्याच आयुष्यातला एक भाग झाला आहे. त्यामुळे याला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. टीकेमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया श्रेयस अय्यरनं दिली आहे.


२३ वर्षांच्या श्रेयस अय्यरनं भारतासाठी ६ वनडे आणि ६ टी-२० मॅच खेळल्या आहेत. वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या नावावर २१० रन आणि टी-२० मध्ये ८३ रन आहेत. अय्यर मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळतो. २०१५ साली आयपीएलच्या लिलावामध्ये श्रेयस अय्यरवर दिल्लीनं २.६ कोटी रुपयांची बोली लावली.


अय्यरनं प्रथम श्रेणी मॅचमध्ये ५४ च्या सरासरीनं ३,९८९ रन केले आहेत. ७५ टी-२० मॅचमध्ये अय्यरनं १२८ च्या स्ट्राईक रेटनं १४ अर्धशतकांच्या मदतीनं १८६८ रन केल्या आहेत.