मुंबई : प्रेमाच्या नात्याच्या विविध परिभाषा  काळानुरूप बदलत आहेत  आणि याच काळानुरुप या नात्यांना स्वीकृतीही मिळत आहे. भारतीय क्रीडा विश्वातही सध्या असंच एक नातं प्रकाशझोतात आलं आहे. मुळात याविषयी काहीसा संमिश्र प्रतिसादच पाहायला मिळत आहे. हे नातं आहे समलैंगिक नात्यात असणाऱ्या धावपटू दुती चंद आणि तिच्या साथीदाराचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीचत दुतीने आपण समलैंगिक संबंधांमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. ज्यानंतर अनेकांनीच थक्क झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. दुतीला या प्रकरणी काही प्रमाणात विरोधही झाल्याचं पाहायला मिळालं. पण, आता मात्र जागतिक पातळीवर तिच्या या नात्याची माहिती पोहोचली असून, एका ग्लोबल स्टारनेही तिला पाठिंबा दिला आहे. त्या ग्लोबल स्टारचं नाव आहे, ऍलेन डिजेनेर्स. आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या ऍलेनची ओळख ही सुप्रसिद्ध टीव्ही शो होस्ट अशी आहे. शिवाय समलैंगिक संबंधांसाधीच्या चळवळींमध्येही ऍलनचं मह्त्वपूर्ण योगदान असल्याचं म्हटलं जातं. 



दुतीचा आपल्याला गर्व वाटत असल्याचं म्हणत ऍलेन डिजेनेर्सने एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये ऍलेनने तिच्या विक्रमाचाही उल्लेख केला. समलैंगिक संबंधांविषयी खुलेपणाने आपल्या नात्याची कबुली देणारी दुती ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या याच निर्णयाचं ऍलेनने कौतुक केलं. सोबतच दुतीचा फोटोही पोस्ट केला. ऍलेनच्या या ट्विटला अनेकांनीच रिट्विट केलं असून, दुती चंदच्या नात्याविषयी आणि तिच्या प्रवासाविषयी जाणून घेण्यात रस दाखवला. 



दुतीने अशा प्रकारे दिली होती तिच्या नात्याची ग्वाही 


प्रेम करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवं असं म्हणत आपल्या या निर्णयासाठी कोणत्याही प्रकारे आपल्याला गृहित धरलं जाऊ नये असं ती म्हणाली होती. आपल्याच गावातील १९ वर्षीय मुलीसोबत गेल्या पाच वर्षांपासून आपलं नातं असल्याचा खुलासा तिने केला होता. भविष्यात तिच्यासोबतच आयुष्य व्यतीत करत एका कुटुंबाचं स्वप्न दुती पाहत आहे.