मडगाव : रणजी खेळाडूला मैदानामध्ये क्रिकेट खेळताना जीव गमवावा लागला आहे. राजेश घोडगे असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. गोव्यातल्या मडगाव इथे मडगाव क्रिकेट क्लब स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत खेळत असताना राजेश हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मैदानातच कोसळला. यानंतर राजेशला इएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इएसआय रुग्णालयातल्या उपचारांना राजेशनं प्रतिसाद न दिल्यामुळे त्याला व्हिक्टर रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथल्या डॉक्टरांनी राजेशला मृत घोषित केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमसीसी मेंबर्स टूर्नामेंट मडगावच्या राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर सुरु होती. एमसीसी ड्रॅगन्स आणि एमसीसी चॅलेंजर्स यांच्यामध्ये हा सामना सुरु होता. एमसीसी चॅलेंजर्सकडून खेळत असताना राजेश नॉन-स्ट्रायकर एन्डला उभा होता. ३१ रनवर नाबाद खेळत असतानाच राजेश मैदानात कोसळला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जवळच्या इएसआय रुग्णालयात राजेशला हलवण्यात आलं. रुग्णालयात राजेशला हार्ट पंपिंग आणि काही औषधंही देण्यात आली होती.



१९९९-२००० च्या मोसमात राजेशनं पदार्पण केलं. दोन प्रथम श्रेणी मॅचमध्ये राजेशनं ७६ रन केले होते. तसंच तो गोव्याकडून ८ लिस्ट ए मॅच खेळला होता. या मॅचमध्ये त्यानं एका अर्धशतकासह ११५ रन केले होते.