मुंबई : भारताचा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंगने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हरभजन सिंगने आपल्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. आपल्या गोलंदाजीने त्याने प्रत्येक दिग्गज फलंदाजाची शिकार केली.
 
हरभजन सिंगसाठी ईडन गार्डन्स खूप खास होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने देशासाठी पुनरागमन केले. पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर, पुढच्या सामन्यात, त्याने पहिल्या डावात तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने 59 धावांत पाच बळी घेतले. त्याच्यामुळेच भारताला हा सामना एक डाव आणि 57 धावांनी जिंकता आला.
 
2001 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा हरभजन सिंगसाठी संस्मरणीय ठरला. त्याने आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या अभिमानाचा चक्काचूर केला होता. चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने 15 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात त्याने 133 धावांत सात बळी घेतले, तर दुसऱ्या डावात 84 धावांत 8 बळी घेतले. भारताने हा सामना दोन गडी राखून जिंकला. त्याचवेळी याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ईडन गार्डन्सवर विजय मिळवला.


2001 मध्ये ईडन गार्डन्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला कसोटी सामना हरभजन सिंगसाठी ऐतिहासिक ठरला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने तीन चेंडूत सलग तीन विकेट घेतल्या. रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न हे त्याचे बळी ठरले. या हॅट्ट्रिकने हरभजन सिंगला नवी ओळख दिली.
 
2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात हरभजनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने 10 षटकात 31 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना 39 धावांनी जिंकला
 
2002 मध्ये हरभजन सिंगने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 43 धावांत पाच बळी घेतले. मात्र भारताने हा रोमांचक सामना पाच धावांनी गमावला.